शेतकऱ्यांचे हाल : विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी
वार्ताहर /किणये
तालुक्याच्या पश्चित भागातील किणये परिसरात थ्री फेज विद्युत पुरवठ्याचा खेळखंडोबा झाला आहे. सुरळीत विद्युत पुरवठा होत नसल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत. शिवारात विद्युत पुरवठ्याचा अभाव निर्माण झाला आहे. त्यामुळे किणये भागातील शेतकऱ्यांनी शुक्रवारी सकाळी हेस्कॉमच्या विभागीय कार्यालय मच्छे (संतिबस्तवाड क्रॉस) येथे जाऊन अधिकाऱ्यांकडे सुरळीत विद्युत पुरवण्याची मागणी केली. किणये, बहाद्दरवाडी, कर्ले, जानेवाडी, रणकुंडये, नावगे क्रॉस या भागात थ्री फेज विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. त्यामुळे शिवारातील पिकांना पाणी देणे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे झाले आहे.
सध्या किणये भागात थ्री फेज विद्युत पुरवठा सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत आहे. मात्र 5 तासांपैकी केवळ एकच तास विद्युत पुरवठा देण्यात येतो, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. विद्युत पुरवठा खंडित करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी वैतागून गेले आहेत. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना भेटून सुरळीत विद्युत पुरवठा करण्याची मागणी केली आहे. भरमाणी नानू पाटील, महादेव बिर्जे, शंकर पाटील, भोमाणी पाटील, राजू पाटील, बाबू डुकरे, सुनिल कर्लेकर, रतन कटांबळे आदींसह या भागातील शेतकरी हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांना माहिती देताना उपस्थित होते.









