कारवार जिल्हा न्यायालयाचा निर्णय : संशयिताच्या कुटुंबीयांची न्यायालयात धाव
पणजी : प्रेम प्रकरणाच्या चौकोनातून पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती विनायक नाईक (वय 52) यांची हत्या सुपारी देऊन करण्यात आली होती. ही घटना कारवार तालुक्यातील हणकोण येथे 22 सप्टेंबर रोजी घडली होती. या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेले लक्ष्य ज्योतीनाथ, अजमल जाबीर आणि मासूम मंजूर यांना कारवार पोलिसांनी शुक्रवारी कारवार जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिघाही संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुण्यात व्यवसाय करणाऱ्या विनायक नाईक यांची हत्या त्यांच्या मूळ गावी कारवार तालुक्यातील हणकोण येथे घरात घुसून करण्यात आली होती. या हत्येचे धागेदोरे गोव्यातील फोंड्यापर्यंत पोहचले होते. त्यामुळे या घटनेने कारवार व गोव्यात खळबळ माजली होती. ही हत्या प्रेमप्रकरणाच्या चौकोनातून घडली आहे, असा पोलिसांचा कयास आहे.
मूळ कारवारचा पण, गोव्यातील फोंडा या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या गुऊप्रसाद राणे याच्या सूचनेनुसार उद्योगपती विनायक नाईक यांची हत्या करण्यात आली होती. विनायक नाईक यांची पत्नीही या हल्ल्यात जखमी झाली होती. आसाम येथील लक्ष्य हा गुऊप्रसाद राणे याचा अत्यंत विश्वासू होता. त्याने बिहारच्या अजमल आणि मासूम यांच्या मदतीने हा खून केला. हे तिघेही कॉन्ट्रॅक्ट किलर असून गुऊप्रसाद राणे यांच्या कंपनीत ते कामाला होते. त्यांनी 50-50 हजार ऊपयांसाठी हे कृत्य केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी संशयितांना चार दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करून तिघांनाही चार दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली. यावेळी लक्ष्य याची पत्नी आणि मुलगा त्याच्या जामिनासाठी कारवारच्या जिल्हा न्यायालयात उपस्थित होते.