बेंगळूर पोलिसांची प्रयागराजमध्ये कारवाई
प्रतिनिधी/ बेंगळूर
देशभरात चर्चेत आलेल्या आयटी इंजिनिअर अतुल सुभाष यांच्या आत्महत्येप्रकरणी बेंगळूर पोलिसांनी अतुल सुभाष यांची पत्नी, सासू आणि मेव्हण्याला अटक केली आहे. या प्रकरणी बेंगळूरच्या मारतहळ्ळी स्थानकातील पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन आरोपींना शोधण्यासाठी ऑपरेशन हाती घेतले होते. त्यानुसार रविवारी प्रयागराजमधून अतुल सुभाष यांची पत्नी लिखित सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया आणि मेहुणा अनुराग सिंघानिया यांना अटक केली आहे.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. आयटी इंजिनिअर सुभाष यांनी आत्महत्या केल्यानंतर पत्नी, तिची आई आणि भाऊ फरारी झाले होते. या तिघांना शोधण्यासह कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसांनी गेल्या शुक्रवारी सुभाष यांची पत्नी लिखित सिंघानिया यांना तीन दिवसांत सुनावणीला हजर राहण्याचे समन्स बजावले. या सर्व प्रकारादरम्यान पत्नी लिखित आणि कुटुंबीयांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता.
अर्जावर सुनावणी होण्यापूर्वीच बेंगळूर पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे. बेंगळूर येथील एका खासगी कंपनीत संचालक असलेल्या उत्तर प्रदेशातील अतुल सुभाष यांनी पत्नी आणि सासरच्या छळाला कंटाळून 9 डिसेंबर रोजी आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी 40 पानी चिठ्ठी लिहिली होती. या प्रकरणी अतुलचा भाऊ बिकासकुमार याने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अतुलच्या पत्नीसह चौघांविरुद्ध बेंगळूरच्या मारतहळ्ळी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केला होता.









