एका महिलेसह तिघा संशयिताना अटक
प्रतिनिधी / फोंडा
पाजीमळ-शिरोडा येथील एका घरात रू 9 लाखाच्या सोन्याच्या दागिने चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांनी तिघां संशयिताना काल गुरूवारी अटक करण्यात आली आहे. गॅबी पाऊलो फर्नाडीस (25, रा. आंबेउदक सावर्डे), शबनम चलवाडी (24, धर्मापूर नावेली), मोहम्मद कासीम शेख (22, गर्दोली चांदोर) अशी त्याची नावे आहेत. चोरीची घटना पाजीमळ शिरोडा परिसरात असलेल्या रसिका पैगिटकर यांच्या घरात शुक्रवार 9 जून रोजी घडली होती.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात चोरट्यांनी घराच्या मागीलदारातून प्रवेश घेत अंदाजे रू. 9 लाखाचे दागिने लांबविले होते. त्यात सोन्याच्या बांगड्या, अंगठ्या, गळयातले व कानातले सोन्याचे दागिने व रोख रू 20 हजार लांबविले होते. एक महिला व दोघा पुरूष संशयिताना गुरूवारी मडगांव येथून अटक करण्यात आली. चोरीच्या घटनेनंतर संशयित दुचाकीसह या भागात फिरताना आढळले होते. त्यानुसार तिघांचीही उलटतपासणीसाठी ताब्यात घेतले असता संशय बळावल्याने तिघां संशयितावर भां.दं.सं. 454, 380 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली आहे. तिघां संशयिताकडून 180 ग्राम वजनाचे सुमारे रू. 9 लाख किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी निरीक्षक तूषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उपनिरीक्षक रश्मी भाईडकर, आदित्य नाईक गावकर, हवालदार केदारनाथ जल्मी, अमेय गोसावी, आदित्य नाईक यांनी ही कारवाई केली.









