पोलिसांवरील सुरक्षेचा भार वाढणार : संघटनांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेंगळूर : चित्तापूर येथे 2 नोव्हेंबर रोजी पथसंचलन आयोजित करण्याबाबत कलबुर्गीच्या जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी निवेदन सादर केले होते. यानंतर भीम आर्मी आणि भारतीय दलित पँथर संघटनेच्या नेत्यांनीही त्याच दिवशी पथसंचलनाला परवानगी देण्यासाठी निवेदन दिले आहेत. त्यामुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. संघानंतर भीम आर्मी आणि दलित पँथर यांनी निवेदन सादर केल्यामुळे निर्माण झालेल्या त्रिकोणी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पोलीस विभागाने आता चित्तापूर शहरात व्यापक व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, कलबुर्गी उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकारला पथसंचालन करू पाहणाऱ्या कोणत्याही संघटनेला स्वतंत्र तारखा देण्याचे तोंडी निर्देश आधीच दिले असले तरी तिन्ही संघटनांच्या नेत्यांनी एकाच दिवशी पथसंचलन करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केल्याने जिल्हाधिकारी या संदर्भात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अहवाल सादर करण्याचे निर्देश
दरम्यान, एकाच दिवशी तीन निवेदन सादर करण्यात आल्याने परवानगी देण्याच्या आणि दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या संभाव्य घटनांचा अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक आणि सेडमचे साहाय्यक आयुक्त आणि चित्तापूर तहसीलदारांना दिले आहेत.
याचिकेवर आज सुनावणी
या सर्व घडामोडींदरम्यान, 18 ऑक्टोबर रोजी संघाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करणारे कलबुर्गी उच्च न्यायालयाचे खंडपीठ शुक्रवारी (24 ऑक्टोबर) त्याच याचिकेची पुढील सुनावणी घेणार आहे. संघाच्या वतीने अशोक पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारही आपला अहवाल खंडपीठासमोर सादर करेल. त्यामुळे 24 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.









