पाच मोटारसायकली जप्त
बेळगाव : मोटारसायकल चोरी करणाऱ्या एका त्रिकुटाला सोमवारी हारुगेरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 1 लाख 90 हजार रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी सोमवारी रात्री एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. शरीफ नदाफ, नागाप्पा कलाल, यल्लाप्पा कलाल अशी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांची नावे आहेत. अथणीचे पोलीस उपअधीक्षक श्रीपाद जलदे, हारुगेरीचे पोलीस निरीक्षक रविचंद्र डी. बी. यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी. एस. उप्पार, आर. आर. कंगनोळ्ळी, शिवराज नाईकवाडी, सी. डी. गंगावती व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. हारुगेरी क्रॉसजवळ वाहनांची तपासणी करत असताना नंबरप्लेट नसलेल्या पल्सर मोटारसायकलवरून हे तिघे जण जात होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता दोन पल्सर, स्प्लेंडर प्लस अशा एकूण पाच मोटारसायकली चोरल्याची कबुली त्यांनी दिली. त्यांच्याजवळून चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.









