केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची महत्त्वपूर्ण घोषणा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काश्मीरमध्ये पाच दशकांहून अधिक काळ दहशतवाद आणि फुटीरतावाद माजविणाऱ्या हुर्रियत कॉन्फरन्स या संघटनेची शक्ती हळूहळू क्षीण होत आहे. या संघटनेशी संबंधित आणि संलग्न असलेल्या आणखी तीन संघटनांनी या संघटनेशी असलेले आपले संबंध तोडले आहेत. या संघटना आता मुख्य राष्ट्रीय प्रवाहात समाविष्ट होऊ इच्छित आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली आहे. अशा प्रकारे हुर्रियतशी संबंध तोडणाऱ्या संघटनांची संख्या 11 झाली असून भविष्यकाळात या संघटनेला आणखी हादरे बसतील, अशी लक्षणे आहेत.
अमित शहा यांनी ‘एक्स’ वरील आपल्या संदेशात ही माहिती मंगळवारी दिली आहे .हुर्रियतची शक्ती कमी होणे, हे जम्मू-काश्मीरच्या हितासाठी चांगलेच आहे. काश्मीर खोऱ्यातील अधिकाधिक संघटना आता हुर्रियतपासून दूर होत असून देशाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ट होत आहेत. याचा अर्थ काश्मीर खोऱ्यातील जनतेचा आता भारताच्या घटनेवरील विश्वास अधिकाधिक सबळ होऊ लागला आहे, असे अमित शहा यांनी आपल्या इंटरनेटवरील संदेशात स्पष्ट केले आहे.
पंतप्रधान मोदी यांचा दृष्टीकोन
सबळ आणि शक्तीशाली भारत साकारणे हा पंतप्रधान मोदी यांचा मुख्य दृष्टीकोन आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सांप्रतच्या काळात घडणाऱ्या घटनांनी या दृष्टीकोनाला अधिक पाठबळ दिले आहे. हुर्रियत कॉन्फरन्सचे जम्मू-काश्मीरभर आपल्या शाखांचे आणि संबंधित संघटनांचे जाळे निर्माण केले होते. तथापि, आता हे जाळे तुटू लागले असून आतापर्यंत 11 संघटनांनी या संघटनेशी नाते तोडून भारताच्या राष्ट्रीय प्रवाहात समाविष्ट होण्याचा प्राधान्य दिले आहे. परिणामी, या प्रदेशात आता शांतता दिसून येत आहे, अशा अर्थाचे प्रतिपादन त्यांनी केले.
तीन दिवसांच्या दौऱ्यावर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसांच्या जम्मू-काश्मीर दौऱ्यासाठी सोमवारी श्रीनगर येथे पोहचले. त्यांनी सोमवारी या प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्य अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. त्यांनी राज्यातील विकास कामांचाही आढावा घेतला. विकास कामांवर देखरेख करणाऱ्या अधिकाऱ्यांशी त्यांनी एका उच्चस्तरीय बैठकीत चर्चा केली. राज्याच्या हितासाठी केंद्र सरकारने जे विकास प्रकल्प हाती घेतले आहेत, ते वेळेत आणि योग्यरितीने पूर्ण करण्यात यावेत. प्रदेशातील जनतेला त्यांचा अधिकाधिक लाभ मिळावा यासाठी ते वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे, हे त्यांनी स्पष्ट केले.









