कारवार येथील सरकारी वैद्यकीय रुग्णालयातील घटना : नातेवाईकांचा रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात आक्रोश
प्रतिनिधी / कारवार
येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयातर्फे वेळेत पेडियाट्रिक वेंटिलेटरची सुविधा असलेली रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्यामुळे तीन महिन्यांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी येथे घडली. या घटनेमुळे येथे संतापाची लाट पसरली आहे. मुलाच्या पालकांनी व नातेवाईकांनी रुग्णालयाच्या विरोधात आक्रोश व्यक्त केला. शिवाय येथील काही नागरिकांनी मुलाचा मृतदेह घेऊन रुग्णालय व्यवस्थापनाच्या विरोधात जोरदार निदर्शने केली. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी दाखल झालेल्या कारवार शहर पोलिसांनी परिस्थितीचा आढावा घेतला.
कारवार तालुक्यातील किन्नर येथील राजेश आणि रिया नागेकर दाम्पत्याला विवाह झाल्यानंतर पाच वर्षांनी तीन महिन्यांपूर्वी मुलगा झाला होता. कफचा त्रास जाणवत आहे म्हणून पहिल्यांदा त्या बालकावर खासगी रुग्णालयात दाखल केले. तथापि बालकाच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने उपचारासाठी येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले होते. तेथील पेडियाट्रिक आयसीयूमध्ये वेंटिलेटरवर ठेऊन उपचार करण्यात येत होते. तरीसुद्धा बालकाच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यावेळी पालकांनी डॉक्टरांकडे बालकाला अन्यत्र हलविण्याची इच्छा व्यक्त केली. डॉक्टरांनी बालकाला उपचारासाठी उडुपीला नेण्याचा सल्ला दिली. बालकाला उडुपीला पेडियाट्रिक वेंटिलेटर असलेल्या रुग्णवाहिकेतून नेणे गरजेचे होते. तथापि अशा प्रकारची सुविधायुक्त रुग्णवाहिका रुग्णालयाकडे उपलब्ध नव्हती त्यामुळे पालकांनी उडुपीहून अशा प्रकारची रुग्णवाहिका मागविली. तथापि, रुग्णवाहिका दाखल व्हायला विलंब झाल्याने बालकाचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईक व सामाजिक कार्यकर्त्यांनी रुग्णालयाविरोधात आक्रोश केला.









