एकाला वाचविण्यास यश
कासरगोड : केरळच्या कासरगोडमध्ये आर्थिक संकटाला तोंड देणाऱ्या एका परिवाराच्या सदस्यांकडून सामूहिक आत्महत्येच्या प्रयत्नाचे प्रकरण समोर आले आहे. येथील ओंडामपुली, परक्कलाई येथे राहत असलेल्या परिवाराच्या चार सदस्यांनी अॅसिडचे सेवन करत आयुष्य संपविण्याचा प्रयत्न केला, परंतु यातील एका सदस्याचा जीव वाचला असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही घटना गुरुवारी पहाटे 3.30 वाजता घडली आहे. मृतांची नावे गोपी मुलावेनिवेदु (56 वर्षे), त्यांची पत्नी के.व्ही. इंदिरा (54 वर्षे), त्यांचा मोठा मुलगा रंजेश (36 वर्षे) अशी आहेत. तर त्यांच्या छोट्या मुलावर परियारम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रागेशची स्थिती गंभीर असल्याचे डॉक्टरांकडुन सांगण्यात आले. अॅसिड प्राशन केल्यावर रागेशने शेजाऱ्यांना फोन करून कळविले होते. यानंतर शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा तोडून सर्वांना बाहेर काढत रुग्णालयात नेले होते. यातील गोपी यांचा वाटेतच मृत्यू झाला, तर इंदिरा आणि रंजेश यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संबंधित परिवार आर्थिक संकटाला सामोरा जात होता. पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यू अशी नोंद करत तपास सुरू केला आहे.









