आशियाई युवा-कनिष्ठ वेटलिफ्टिंग स्पर्धा
वृत्तसंस्था/ ग्रेटर नोएडा
आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताने पाचव्या दिवशी दोन रौप्य व एक कांस्यपदक पटकावले. पल्लवी सेनापती व बी वेंकट कृष्णा यांनी रौप्यपदके मिळविली.
कनिष्ठ महिलांच्या 64 किलो वजन गटात पल्लवीने एकूण 196 (87 व 109) किलो वजन उचलत दुसरे स्थान मिळविले. इराणच्या फातेमेह केशवअर्झने 197 किलो वजन उचलत सुवर्ण तर उझ्बेकच्या मदिनाबानू दुरायेव्हाने 190 किलो वजन उचलत कांस्य मिळविले.
युवा विभागात पुरुषांच्या 73 किलो वजन गटात बी. वेंकट कृष्णाने रौप्य घेतले. त्याने एकूण 271 (120 व 151) किलो वजन उचलले. उझ्बेकच्या खिकमातिलो खायदारोव्हने 287 किलो वजन पेलत सुवर्ण पटकावले. युवा विभागातच महिलांमध्ये भारताच्या हरिका बेल्लानाने 59 किलो गटात कांस्य घेतले. तिने एकूण 176 (78 व 98) किलो वजन तोलले. उझ्बेकच्या ल्युडमिला इलेफ्टिरियादीने सुवर्ण जिंकताना 177 किलो वजन उचलले.









