चकमकीत दोन दहशतवाद्यांनाही कंठस्नान : राजौरी, अनंतनागमध्ये शोधमोहीम गतिमान
वृत्तसंस्था/ श्रीनगर, अनंतनाग
काश्मीरमधील अनंतनाग जिह्यातील कोकरनाग भागात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या कर्नलसह सुरक्षा दलाचे तीन अधिकारी हुतात्मा झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी बुधवारी दिली. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष, जम्मू आणि काश्मीरचे पोलीस उपअधीक्षक हुमायून भट हे गोळीबारात गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला, असे बुधवारी सायंकाळी जाहीर करण्यात आले.

जम्मू-काश्मीरमधील राजौरी आणि अनंतनागमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून चकमक सुरू आहे. सोमवारपासून राजौरीमध्ये चकमक सुरू झाली असून त्यात दोन दहशतवादी ठार झाले आहेत. या संघर्षात तिघे हुतात्मा झाल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. अनंतनागमधील गडोले परिसरात मंगळवारी संध्याकाळी दहशतवाद्यांविरोधातील कारवाईला सुऊवात झाली पण रात्री ती मागे घेण्यात आली. या कारवाईत लष्कराच्या एका श्वानाचाही मृत्यू झाला आहे. त्याने स्वत:चा जीव धोक्मयात घालून आपल्या हँडलरचा जीव वाचवला. दुसरीकडे, बुधवारी दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिह्यात सुरक्षा दल शोधमोहीम राबवत असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्यात एक जवान आणि एक पोलीस जखमी झाल्याची माहिती सुरक्षा प्रवक्त्याकडून देण्यात आली.
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा प्रत्येक हेतू हाणून पाडण्यासाठी आपले भारतीय लष्कर सदैव तत्पर आहे. यासाठी लष्कर सतत गस्त घालत असते. दहशतवाद्यांच्या घुसखोरीची कुणकुण लागताच तात्काळ कारवाई करून त्यांना रोखण्यासाठी कारवाई केली जाते. सध्या राजौरी जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. सुरक्षा दलांना या परिसरात 3-4 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तेथे शोधमोहीम राबवण्यात आली. छाप्यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर चकमक सुरू झाली. खराब हवामान असूनही सुरक्षा दलांनी राजौरी शहरापासून 75 किमी अंतरावर असलेल्या भागाला रात्रभर वेढा घालत सकाळी आसपासच्या भागात शोध तीव्र केला, असे एडीजी मुकेश सिंह यांनी सांगितले.
श्वानाने बलिदान देत वाचवले हँडलरचे प्राण
राजौरीतील चकमकीत लष्कराच्या एका श्वानालाही प्राण गमवावे लागले. या चकमकीत बलिदान प्राप्त झालेल्या लष्कराच्या श्वानाचे नाव केंट असल्याचे लष्करी अधिकाऱ्याने सांगितले. चकमकीदरम्यान त्याने आपल्या हँडलरला वाचवले. मात्र, तो स्वत: हुतात्मा झाला. पळून जाणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सैनिकांच्या तुकडीचे नेतृत्व करत असताना ही घटना घडली. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराच्या 21 आर्मी डॉग युनिटमधील केंट नावाच्या 6 वषीय लॅब्राडोरने आपल्या हँडलरचे रक्षण करताना आपल्या प्राणाची आहुती दिली.
चालू वर्षात आतापर्यंत 26 दहशतवादी ठार
या वर्षात आतापर्यंत सुरक्षा दलांनी राजौरी-पुंछ जिह्यात 26 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 10 सुरक्षा जवानही हुतात्मा झाले आहेत. काश्मीर पोलीस आणि भारतीय लष्कराने 15 ऑगस्टपूर्वी संयुक्त कारवाईदरम्यान 6 दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यांच्याकडून दारूगोळा आणि शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत.









