प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वक्तव्य करण्याऐवजी महाराजांचा इतिहास वाचला तर चांगले होईल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनेकवेळा वेगवेगळी विधानं करण्यात आलेली आहेत. या लोकांची बुद्धी भ्रष्ट झालेली असावी. म्हणूनच यांना विस्मरण होत असावे. अशी विधानं करणाऱयांमध्ये विकृती असावी. कदाचित त्यांचा अंतही होऊ शकतो,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार उदयनराजे यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त टिप्पणी करणाऱयांवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र मी अमित शाह यांना लिहिणार आहे, असे उदयनराजे म्हणाले आहेत. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते शुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. याच विधानांमुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे गटातील नेत्यांनी आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपालांनी राजीनामा द्यावा तसेच भाजपाने राज्याची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.








