वार्ताहर /उचगाव
उचगाव गणपती गल्लीतील लक्ष्मी नागोजी पावशे यांचे राहते घर नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या तडाख्यामध्ये कोसळून तीन लाखाचे नुकसान झाल्याने सदर गरीब कुटुंब बेघर झाले आहे. तरी शासनाने तातडीने या गरीब कुटुंबाला आर्थिक मदत करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी या कुटुंबाकडून करण्यात येत आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाच्या माऱयामध्ये लक्ष्मी नागोजी पावशे यांचे राहते घर कोसळले. याच घरामध्ये लक्ष्मी नागोजी पावशे या एकटय़ाच वास्तव्य करून राहतात. पतीचेही निधन झाले आहे. तर मुलगा कामानिमित्त बाहेरगावी राहतो. ज्या दिवशी घर कोसळले त्या दिवशी नशीब बलवत्तर म्हणून त्या आपल्या दीराच्या घरी झोपायला गेल्याने त्या बचावल्या. सदर घराचे भरपूर नुकसान झाल्याने नवीन घराची उभारणी केल्याशिवाय पर्याय नाही.
आता या महिलेने सध्या कोणाकडे दाद मागावी, हा मोठा प्रश्न असून तिचे जगणे मुश्किल झाले आहे. तरी शासनाने तातडीने याची पाहणी करून त्यांना आर्थिक मदत करावी, अशीही मागणी नागरिकांनी शासनाकडे केली आहे.









