सोलापूर :
डंपरने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत मोटरसायकलवरील तिघे मजूर ठार झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास मुस्ती–धोत्री रस्त्यावरील पाझर तलावाजवळील वळणावर घडली. तिघेही एकाच गावातील असल्याने मुस्ती गावावर शोककळा पसरली आहे.
अपघातात ठार झालेल्यांची नावे देविदास मारुती दुपारगुडे (वय ३२), नितीन शाम वाघमारे (वय ३५), हनुमंता गोपीनाथ पवार (वय ४०)
(तिघेही रा. मुस्ती, ता. दक्षिण सोलापूर) हे तिघे मजूर मुस्ती गावातून मोटरसायकलवरून धोत्री (ता. दक्षिण सोलापूर) येथे मजुरीच्या कामासाठी जात होते. दरम्यान, धोत्रीकडून मुस्ती दिशेने माती भरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने पाझर तलाव क्रमांक १ जवळील वळणावर समोरून मोटरसायकलला जोरदार धडक दिली.

या धडकेत तिघेही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन पडले. त्यांच्या डोक्याला आणि शरीराच्या इतर भागांना गंभीर मार लागल्यामुळे तिघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपरचा चालक न थांबता घटनास्थळावरून पसार झाला.
या घटनेमुळे मुस्ती गावात हळहळ व्यक्त होत असून, परिसरात शोककळा पसरली आहे. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी सोलापूर सिव्हिल रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.








