हरियाणातील दुर्घटना : अनेक घरांनाही तडे
वृत्तसंस्था/ सोनीपत
हरियाणातील सोनीपतमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या फटाक्मयांच्या कारखान्यात शनिवारी भीषण स्फोट झाला. त्यानंतर लागलेल्या आगीत तिघांचा मृत्यू झाला आहे. मदत व बचावकार्यादरम्यान तीन मृतदेह सापडले. मृतांमध्ये दोन महिला आणि एका तरुणाचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य 7 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती देण्यात आली.
सोनीपतच्या रिधौ गावात घरात बेकायदेशीरपणे चालणाऱ्या फटाक्मयांच्या कारखान्यात स्फोट झाल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. हा स्फोट इतका जोरदार होता की नजिकच्या घराच्या भिंतींनाही तडे गेले. सिलिंडरचा स्फोट होऊन हा अपघात झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या दुर्घटनेप्रकरणी वेदप्रकाश नामक एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी केली जात आहे.
स्फोट झाल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन विभाग, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि एफएसएल टीम घटनास्थळी पोहोचली होती. सर्व यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या पथकाने कारखान्यात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्यांची सुटका केली. स्फोटाची घटना घडली त्यावेळी 10 मजूर काम करत होते. त्यापैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य 7 जण जखमी झाले.









