मृतांमध्ये दोघा सख्ख्या भावांचा समावेश, एक जखमी : शेतातून येताना दुर्घटना
खानापूर : खानापूर तालुक्यातील गोधोळी येथे अज्ञात वाहनाच्या ठोकरीत तीनजण ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री बाराच्या सुमारास घडली. गोधोळी येथील शेतकरी महाबळेश्वर नागेंद्र शिंदे (वय 65), पुंडलिक लोकाप्पा रेडकर (वय 72), कृष्णा लोकाप्पा रेडकर (वय 65) हे तिघेजण ठार झाले. तर मंजुनाथ कृष्णा कळगणीकर (वय 40) हे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद नंदगड पोलिसात झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. या अपघातात गोधोळी गावातील तीन शेतकरी ठार झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे. य् ााबाबत माहिती अशी की, गोधोळी येथील शेतकरी उसाला पाणी देण्यासाठी तसेच सध्या आंब्याचा हंगाम सुरू असल्याने राखणीसाठी शेतात जात आहेत. वरील अपघातात ठार झालेले शेतकरी हे गोधोळी गावातील एकमेकाचे शेजारी होते. सर्वजण मिळून पाणी देऊन घरी जाण्यासाठी एकत्र येऊन रस्त्याशेजारी थांबले होते. त्यावेळी रामनगरहून येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार ठोकर दिल्याने महाबळेश्वर शिंदे व पुंडलिक रेडेकर हे जागीच ठार झाले. तर कृष्णा रेडेकर हे गंभीर जखमी झाल्याने अधिक उपचारासाठी त्यांना केएलई हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुंडलिक रेडेकर व कृष्णा रेडेकर हे दोघे सख्खे भाऊ होत. नंदगड पोलीस ठाण्याचे निरीक्षक लमाणी यांनी या अपघाताच्या तपासासाठी दोन पथके नियुक्त केली असून या पथकांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली असून याबाबत गोधोळीपासून धारवाडपर्यंत सर्व ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली आहे. अपघात झालेला वेळ आणि वाहने गेलेल्या अंदाजानुसार तसेच अपघातस्थळी वाहनाचा काही भाग पडलेला असल्याने हे अज्ञात वाहन टाटा अल्ट्रोज असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. गोधोळी येथे तिन्ही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
वेगावर नियंत्रण आणण्यासाठी उपाययोजना करा
य् ाा भागातील शेतकरी उसाला पाणी देणे, तसेच वन्य प्राण्यापासून शेताचे संरक्षण करणे व शेताची राखण करण्यासाठी रात्री-अपरात्री या रस्त्यावरून जात असतात. सदर रस्ता हा सुस्थितीत असल्याने वाहने अतिवेगाने जात असल्याने या भागात वारंवार अपघात घडत आहेत. यासाठी वेगावर नियंत्रण आणण्यासाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी या भागातील कार्यकर्ते रुद्राप्पा बोबाटे यांनी केली आहे.









