भावोजी, मेहुण्यासह एका युवतीचा समावेश : मेरशीहून जात होते हणजूण येथील घरी,दोन जखमी युवतींवर गोमेकॉत उपचार
पर्वरी : येथील जुन्या टीव्हीएस शोरूमजवळ रविवारी उत्तररात्री 1.30 वाजता झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. आबेगल डिसोझा (वय 21, रा. मेरशी) ही युवती, वेल्ड्रॉफ डिसोझा (25, हणजूण) हा युवक, आणि कारचालक युवक शॉन फर्नांडिस (25, काणका-खलपवाडा) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. फियोना डिसोझा (22, मेरशी), आणि निनोस्का फर्नांडिस (21, हणजूण) या दोन्ही तऊणी गंभीर जखमी झाल्या. सध्या त्या बांबोळी येथे गोवा वैद्यकीय इस्पितळात (गोमेकॉ) उपचार घेत आहेत.
या संबंधी पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे अपघातातील पाचहीजण नातेवाईक आहेत. मेरशीहून पाचहीजण घरी जात असताना पर्वरीत हा स्वयंअपघात घडला. त्यांच्या टाटा नेक्सॉन इलेट्रिक कार क्र. जीए 03 झेड 7790 चा चालक शॉन फर्नांडिस याचे कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव वेगाने असलेल्या कारने रस्त्याच्या बाजूच्या झाडाला जोरदार धडक दिली. कारमधील पाच व्यक्तींपैकी तिघांचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाले आहेत. फियोना डिसोझा (वय 22) आणि निनोस्का फर्नाडिस या दोघीजणी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्मयाला आणि हातापायला गंभीर दुखापती झाल्या असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. हवालदार विवेक तोरस्कर यांनी अपघाताचा पंचनामा केला आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील अपघात आणि अपघाती मृत्युंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सरकारने यावर काहीतरी उपाययोजना कऊन आळा घालण्याची गरज आहे. दारूच्या नशेत वाहने चालवताना रात्रीच्या वेळी घडणाऱ्या अपघातांची संख्याही वाढत आहे. हा अपघातही दारूच्या नशेत कार चालवताना झाला की नियंत्रण सुटल्याने झाला याचा पोलीस शोध घेत आहेत.
कोरोनाने पत्नीला…अपघाताने मुलाला नेले!
हणजूणच्या डिसोझा कुटुंबावर काळाचा घाला : पर्वरी अपघातात तिघा नातेवाईकांचा मृत्यू
दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे पत्नीचा मूत्यू झाला. त्यातून कसाबसा सावरत असतानाच आता या अपघातात मुलगा व जावयाच्या मृत्यूच्या घटनेने माझ्यावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. हेच पाहण्यासाठी मला परमेश्वराने जिवंत ठेवले आहे का? असे म्हणत पर्वरी अपघातातील मयत वेल्ड्रॉफ डिसोझा याचे वडील नितीविदेत डिसोझा टाहो फोडून रडत होते. या अपघातामुळे दाभोळवाडा हणजूण येथील वेल्ड्रॉफ डिसोझा यांचे कुटुंबीय दु:खसागरात बुडाले आहेत. पर्वरी येथे शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या भीषण स्वयं अपघातात कारमधील तिघांचा मृत्यू झाला. शॉन फर्नांडिस (काणका-खलपवाडा), वेल्ड्रॉफ डिसोझा (हणजूण), आबेगल डिसोझा (मेरशी) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. फियोना डिसोझा व निनोष्का फर्नांडिस या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
पत्नी गेली कोरोनाने
मयत वेल्ड्रॉफ डिसोझा याचे वडील नितीविदेत सांगू लागले… वेल्ड्रॉफची आई मारिबीना डिसोझा यांचा दोन वर्षांपूर्वी कोविडमुळे मृत्यू झाला. त्यावेळी वेल्ड्रॉफला कोविड झाला होता. त्याला मडगावच्या हॉस्पिसियोमध्ये दाखल करण्यात आले होते. वीस दिवसानंतर ठिक होऊन तो घरी परतला, मात्र त्याची आई घरी आली नाही. कोरानाने तिचा बळी घेतला. या दु:खातून आम्ही कसेबसे सावरलो.
शनिवारी रात्री होती पार्टी
गेल्या जानेवारीमध्ये शॉन फर्नांडिसबरोबर वेल्ड्रॉफची बहीण पेटरेशिया हिचा विवाह झाला. वेल्ड्रॉफचा मोठा भाऊ वेलारियन घरीच असतो तर छोटा भाऊ वेलेंटीन विदेशात बोटीवर कामाला असतो. वेल्ड्रॉफ हा मुथूट फायनान्समध्ये कामाला होता. शनिवारीच त्याने ते काम सोडले होते. सोमवारपासून तो दुसरीकडे ऊजू होणार होता. वीकएंड असल्यामुळे सर्वांनी आपल्या घरी एकत्रित पार्टी ठेवली होती. कुठेही पार्टीचा कार्यक्रम असला की ते सर्व एकत्र जात असत…. अश्रु आवरतच वेल्ड्रॉफचे वडील सांगत होते व्यथा!
‘मेरशीतून नातलगांना घेऊन येतो’
पार्टी असल्याने रात्रीच्यावेळी सर्वजण दाभोळवाडा येथे आमच्या घरी आले होते. रात्री 11 वा. आम्ही सर्वांनी जेवण घेतले. रात्र झाल्याने मी झोपायला जात असताना वेल्ड्रॉफ व शॉन यांनी मेरशीहून काहीजण आले नसल्याने त्यांना घेऊन यायला जातो… असे सांगून ते बाहेर पडले. मेरशी येथे गेलेला वेल्ड्रॉफ पुन्हा घरी पोहोचलाच नाही…
शॉन फर्नांडिस एकमेव मुलगा
दरम्यान, शॉन फर्नांडिस हा खलपवाडा काणका येथील फ्रान्सिस डिसोझा यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांचा काणकामध्ये गाडी धुण्याचा व्यवसाय आहे. शिवाय वडिलांचा जमिनीचाही व्यवसाय आहे. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून कुटुंबीयांतील सर्वांनी बोलण्याचे टाळले.
तोपर्यंत सर्व काही संपले होते…
वेल्ड्रॉफचे वडील अश्रु आवरतच सांगत होते… रात्री 3 वा.च्या दरम्यान वेल्ड्रॉफचे काही मित्र घरी आले. त्यांनी आपल्याला उठवले. हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे असे सांगितले. कारण विचारले तर कोणी सांगण्यास तयार नव्हते. गाडीने जात असताना पर्वरी येथून मोठ्या मुलाला फोन लावला. त्याने तो बांबोळी येथे हॉस्पिटलमध्ये असल्याचे सांगितले. गोमेकॉत जाऊन पाहिले… सर्व काही संपले होते. कुटुंबातील तिघांचा मृत्यू पाहून तेथेच कोसळलो… नितीविदेत डिसोझानी हंबरडा फोडला.
वाढत्या अपघातांकडे गांभिर्याने पाहावे : आमदार केदार नाईक
पोलीस सध्या ‘ड्रिंक अॅण्ड ड्रायव्ह’ विरोधात कारवाई करत आहेत, मात्र अपघात काही नियंत्रणात येत नाहीत. पोलिसांनी सायंकाळी 7 नंतर गस्त घालून तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत आमदार केदार नाईक यांनी व्यक्त केले. गेल्या 15 दिवसात कितीतरी अपघात झाले आहेत. रात्री रस्त्यावर ट्राफिक नसल्याने वाहने वेगाने हाकली जातात. त्यामुळे पोलिसांनी रात्रीच्यावेळी वाहनांच्या स्पीडची तपासणी करावी. नशेत वाहन चालवणारे, अतिवेगाने गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करावी. याकडे गृहखात्याने लक्ष द्यावे, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली.









