अथणी :
कागवाड-विजापूर राज्यमार्गावरील मुरगुंडी येथील बनजवाड पी. यु. कॉलेजजवळ वीट भरुन जाणारा ट्रक व उसाची रोपे घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या अपघातात पिकअप वाहनातील दोघे जागीच ठार झाले. तर अपघात होताच बचावासाठी गेलेल्या कारचालकाला अन्य एका कारने धडक दिल्याने त्याचाही मृत्यू झाल्याची घटना घडली. या अपघातात चारजण जखमी झाले आहेत.
शुभम युवराज चव्हाण (वय २४, ता. शिरोळ), महेश सुभाष गाताडे (वय ३०, रा. गणेशवाडी ता. शिरोळ) अशी पिकअप वाहनातील ठार झालेल्यांची नावे आहेत. तर सचिन विलास माळी (वय ४२, रा. कवलापूर) असे वाचविण्यासाठी गेलेल्या मृताचे नाव आहे.
घटनेविषयी अधिक माहिती अशी, रत्नागिरीहून चीरवीट घेऊन जाणारा ट्रक (केए २८ एए ५३८१) विजापूरच्या दिशेने जात होता. तर अथणीहून कागवाडच्या दिशेने उसाची रोपे घेऊन पिकअप वाहन जात होते. गुरुवारी मध्यरात्री मुसळधार पाऊस सुरु होता. त्यातून मार्ग काढत जाणाऱ्या या वाहनांची मरगुंडी जोराची धडक झाली. त्यात शुभम चव्हाण, महेश गाताडे हे जागीच ठार झाले. तर अपघातस्थळी मदत करण्यासाठी गेलेले सचिन माळी यांना कार (क्रमांक केए २२ एमसी ९२५१) ने धडक दिली, त्यात त्यांचाही मृत्यू झाला.
दरम्यान, अपघात होताच अन्य एका कारमधील नागरिक बचावासाठी गेले असता त्यांनाही दुखापत झाली. त्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार करुन सोडण्यात आले. आले. अपघाताची नोंद अथणी पोलिसात झाली आहे.








