कुलगाममध्ये दहशतवाद्यांशी चकमक : सुरक्षा वाढवत लष्कराकडून शोधमोहीम
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये शुक्रवारी रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत 3 जवान हुतात्मा झाले. या चकमकीनंतर दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे सर्च ऑपरेशन शनिवारी दिवसभर सुरू होते. ‘पीएएफएफ’ या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्विकारली असून अनुच्छेद 370 रद्द केल्याचा बदला घेतल्याची कबुली त्यांच्याकडून देण्यात आली आहे. या संघर्षादरम्यान दहशतवादी सुरक्षा दलाच्या जवानांकडील चार एके-47 रायफल घेऊन पळून गेले. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी अतिरिक्त सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले आहे.
कुलगाम जिह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून लष्कराने कुलगाम पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली होती. या मोहिमेदरम्यान शुक्रवार, 4 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सैनिक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या गोळीबारात 3 जवान जखमी झाले. जखमी जवानांना उपचारासाठी ऊग्णालयात नेल्यानंतर रात्री उशिरा उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याचे सांगण्यात आले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. संघर्ष झालेल्या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिह्यातील हलान जंगल परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी वेढा घालत शोध मोहीम राबवली. यादरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर शोधमोहिमेचे चकमकीत रुपांतर झाले. या गोळीबाराला सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले. परिसरात अतिरिक्त फौज पाठवण्यात आली असून शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
कलम 370 हटवून 4 वर्षे पूर्ण
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्याला 4 वर्षे पूर्ण होत असतानाच शनिवार, 5 ऑगस्टला दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक झाली आहे. ‘पीएएफएफ’ने एक निवेदन जारी करत सरकारने कलम 370 बेकायदेशीर रद्द केल्याच्या घटनेला चार वर्षे पूर्ण होत असताना आमच्या सदस्यांनी हल्ला केल्याची कबुली दिली आहे. तर दुसरीकडे भाजपने श्रीनगरमध्ये विजयी पदयात्रा काढण्याची घोषणा केली आहे. त्याचवेळी खबरदारी म्हणून अमरनाथ यात्रा ठराविक काळासाठी रोखण्यात आली आहे.