जमखंडी शहर पोलिसांची कारवाई : चोरटे जमखंडी, बेळगाव जिल्ह्यातील
वार्ताहर / जमखंडी
जमखंडी शहर व ग्रामीण भागात चोरी प्रकरणी येथील शहर स्थानकाच्या पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली. त्यांच्या जवळील 24 लाखाचा ऐवज जप्त केला असल्याची माहिती बागलकोट एस. पी. जयप्रकाश यांनी दिली. दुर्गाप्पा फकीरप्पा वाल्मिकी (वय 25) रा. मुधोळ तालुका, शिवकुमार नागप्पा होसमनी (वय 21) रा. जमखंडी तालुका, मंजुनाथ लक्ष्मण गुंजी (वय 25) रा. मल्लापुर, तालुका कित्तुर जिल्हा बेळगाव अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यांच्या जवळील 314 ग्रॅम सोने, एक किलो चांदीचे दागिने, एक लॅपटॉप, एक दुचाकी वाहन व रोख एक लाख रुपये रक्कम असा एकूण 24 लाखाचा ऐवज जप्त केला असून यामुळे तीन घरफोडीचा तपास लागला असल्याचे सांगण्यात आले.
अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख प्रसन्न देसाई, जमखंडीचे डी वाय एस पी शांतवीर ई, सीबीआय गुरुनाथ चव्हाण, पीएसआय बसवराज कोन्नुरे, नागराज खिलारे आदींच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. एएसआय पी. एम. कुंभार, के. पी. सौंदत्ती, एच. एस. मंडेगार, ए. जी. वांगी, बी. एम. जम्बगी, एस. पी. तुप्पद, पी.एच. घाडगे, एस. बी. हनगडी, रमेश गस्ती, मल्लू लिंगापगोल, पी. एम. होसमनी कारवाईत भाग घेतला. या सर्वांचे एस. पी. जयप्रकाश यांनी अभिनंदन करून रोख बक्षीस जाहीर केले. आरोपींची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली.









