वार्ताहर /शिवोली
रामवाडा, ओशेल येथे आंब्याचे झाड कोसळून तिघे जखमी झाल्याचे घटना घडली आहे. तसेच घरांचीही मोठी हानी झाली. सदर घटना मंगळवार दि. 7 रोजी 5.15 वा. घडली.
बाबय चोडणकर यांच्या घरामागे माड व आंब्याचे झाड होते. मंगळवारी संध्या. 5.15 वा. मोठा आवाज आला. अचानक काहीतरी पडलेल्याचा आवाज झाल्यामुळे आसपास लोकांनी त्या दिशेने धाव घेतली असता बाबय चोडणकर, जयंत चोडणकर, रवींद्र घाटवळ व प्रीतेश चोडणकर यांच्या घरावर सदर आंब्याचे झाड व माड कोसळल्याचे दिसून आले, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
यामध्ये बाबय, जयंत, रवींद व प्रीतेश चोडणकर यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले. आपल्या घरात असलेले रवींद्र घाटवळ, रविना घाटवळ व बाबय यांची कन्या पल्लवी यांच्या अंगावर कौले पडल्याने तिघे जण जखमी झाले. पल्लवी व रविना यांना किरकोळ दुखापत झाली तर रवींद घाटवळ यांना दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी म्हापसा येथील इस्पितळात न्यावे लागले. त्यांच्यावर उपचार करून घरी पाठविण्यात आल्याचे बाबुसो वेर्णेकर यांनी सांगितले.
उपसरपंच प्रवीण कोचरेकर यांनी म्हापसा येथील अग्निशामक दलाला या घटनेची कल्पना देताच, दलाचे अधिकारी घटनास्थळी जाऊन त्यांनी घरावर पडलेल्या आंब्याच्या फांद्या हटविल्या.
पंचायतीतर्फे मदत कार्य-सरपंच
बाबय, जयंत व रवींद्र यांच्या घरावर आंब्याचे झाड पडून बरेच नुकसान झाले. त्यांच्या घराला लागून असलेले आंब्याचे झाड पंचायतीतर्फे काढण्यात येईल, अशी माहिती सरपंच वंदना नार्वेकर यांनी दिली.









