केरळच्या युवकाचा रुममेटनेच घेतला जीव : आरोपीला अटक
वृत्तसंस्था/ लंडन
ब्रिटनमध्ये भारतीयांवरील हल्ले वाढत चालले आहेत. तेथे 4 दिवसांमध्ये 3 भारतीयांची हत्या करण्यात आली आहे. लंडनमध्ये मूळचा केरळचा रहिवासी असलेल्या भारतीयाची चाकूने वार करत हत्या करण्यात आली आहे. मेट्रोपॉलिटन पोलिसांनी शनिवारी केरळचाच रहिवासी 25 वर्षीय सलमान सलीमला 37 वर्षीय अरविंद शशिकुमारच्या हत्येप्रकरणी अटक केली आहे.
सलमान अन् शशिकुमार हे दोघेही साउथम्पटन बे, कँबरवेलमध्ये एकाच घरात राहत होते. या घरात त्यांच्यासोबत आणखी दोघेजण वास्तव्य करत होते. घरात झालेल्या भांडणानंतर सलमानने अरविंदवर चाकूने वार केले होते. आरोपी सलमानसोबत हत्येवेळी तेथे उपस्थित अन्य 2 मल्याळी रुममेट्सना देखील ताब्यात घेण्यात आले आहे.
अरविंद शशिकुमारचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. आरोपीने त्याच्या छातीवर चाकूने वार केला होता. पोलिसांनी आरोपी सलमान सलीमला शनिवारी क्रॉयडन मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर केले हेते. शशिकुमार हा मागील 10 वर्षांपासून ब्रिटनमध्ये स्टुडंट व्हिसावर राहत होता, हत्येच्या घटनेची माहिती त्याच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास स्पेशल क्राइम कमांडच्या मदतीने केला जात आहे.
काही दिवसांपूर्वी हैदराबादच्या 27 वर्षीय युवतीचा लंडनमध्ये तिच्याच घरात चाकूने वार करत जीव घेण्यात आला होता. तेजस्विनी रे•ाr असे या युवतीचे नाव होते आणि ती लंडनच्या वेम्बलीमध्ये स्वत:च्या मित्रांसोबत राहत होती. पोलिसांनी याप्रकरणी दोन जणांना अटक केली आहे. तेजस्विनी मागील वर्षी पुढील शिक्षणासाठी लंडनमध्ये दाखल झाली होती.
तत्पूर्वी नॉटिंघमशायरमध्ये तीन जणांची हत्या करण्यात आली होती. यात भारतीय युवा क्रिकेटपटू ग्रेस ओ माल्ले कुमारचाही मृत्यू झाला होता. पोलिसांनी याप्रकरणी 31 वर्षीय आरोपीला अटक केली होती.









