बेंगळूर : गोवा परिवहनची कदंब बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन पोलीस कॉन्स्टेबलसह तिघेजण जागीच ठार झाले. गदग जिल्ह्यातील हर्लापूर क्रॉसजवळ राष्ट्रीय महामार्ग क्र. 67 वर गुरुवारी रात्री हा अपघात घडला. पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन नेल्लूर (वय 35), वीरेश उप्पार (वय 36) तसेच रवी नेल्लूर (वय 32) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. घटनेविषयी अधिक माहिती अशी, अर्जुन नेल्लूर, वीरेश उप्पार आणि रवी नेल्लूर हे कारमधून प्रवास करत होते. भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार महामार्गावरील दुभाजकाला आदळून नंतर कदंबा बसला धडकली. अपघातात तिघेजण जागीच ठार झाले.
विवाहासाठी अवघे काही दिवस असतानाच…
अपघातातील मृतांपैकी दोन कॉन्स्टेबलांचा विवाह निश्चित झाला होता. अर्जुन नेल्लूर आणि वीरेश उप्पार हे काही दिवसांत विवाहबद्ध होणार होते. दोघेही पोलीस दलात भरती होऊन सात वर्षे झाली होती. वीरेश हे कोप्पळ जिल्हा पोलीस वायरलेस विभागात तर अर्जुन हे हावेरी जिल्हा पोलीस वायरलेस विभागात कार्यरत होते.









