पोलिसांनी घेतल्या ताब्यात : मूर्तींचे कशामुळे झाले नुकसान याची चौकशी होणार
वृत्तसंस्था/ संभल
उत्तरप्रदेशच्या संभल येथील खग्गू सराय गल्लीत शिव मंदिर परिसरात असलेल्या प्राचीन विहिरीच्या उत्खननादरम्यान भगवान शिव, गणेश आणि माता पार्वतीची खंडित मूर्ती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जात मूर्ती स्वत:च्या ताब्यात घेतल्या आहेत. विहिरीत शोधकार्य सुरू असताना भगवान गणेश आणि भगवान कार्तिकेय यांच्या तुटलेल्या मूर्ती मिळाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक श्रीशचंद यांनी दिली आहे.
या मूर्ती विहिरीत ढिगारा आणि मातीदरम्यान आढळून आल्या आहेत. विहिरीचे उत्खनन अद्याप सुरू आहे. मूर्ती कशामुळे खंडित झाल्या याची चौकशी आता केली जात आहे. तर दुसरीकडे 46 वर्षांपासून बंद प्राचीन शिव मंदिरात लोक दर्शन आणि पूजा करण्यासाठी मोठ्या संख्येत पोहोचत आहेत. खबरदारीदाखल पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मूर्ती मिळाल्याचे कळताच संभल क्षेत्रातील लोकांचे औत्सुक्य वाढले आहे. तर तीन मूर्तींना पोलिसांकडून तज्ञांकडे अधिक तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. या मूर्ती कुठल्या काळातील आहेत हे आता जाणून घेतले जाणार आहे.
1978 मध्ये झालेल्या दंगलीनंतर खग्गू सराय येथील 40 रस्तोगी कुटुंबांनी पलायन केले होते. मुस्लीमबहुल क्षेत्र असल्याने मंदिराची देखभाल करणारा कुणच नव्हता, यामुळे हे मंदिर बंद करावे लागले होते. पोलीस-प्रशासनाला शनिवारी याची माहिती मिळताच मंदिराचे द्वार खुले करत सफाई करविण्यात आली होती.
संभल येथील खग्गू सराय परिसरातील प्राचीन विहिरीत प्रशासनाकडून शोधकार्य हाती घेण्यात आले आहे. याचदरम्यान सोमवारी भगवान शिव, गणेश आणि माता पार्वतीची खंडित मूर्ती मिळाल्याची माहिती कळताच लोक मोठ्या संख्येत तेथे दाखल होऊ लागले आहेत.
घटनास्थळी पोलीस तैनात करण्यात आले असून खोदकाम सुरळीतपणे चालू राहिल याची खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात पंडित शशिकांत शुक्ल, अवनीश शास्त्राr, आचार्य विनोद शुक्ल आणि अन्य आचार्यांनी विधिवत पूजा केली आहे. यापूर्व भगवान शिव आणि अन्य देवतांच्या मूर्तींना वस्त्र धारण करविण्यात आले होते. स्थानिक लोक या मंदिराला 200 वर्षांपेक्षा अधिक जुने मानतात. मंदिराच्या जर्जर अवस्थेला दूर करण्यासाठी प्रशासन आणि भाविकांनी आता पुढाकार घेतला आहे. सध्या पूजा-अर्चना तात्पुरत्या स्वरुपात केली जात आहे, लवकरच एक स्थायी पुजारी नियुक्त केला जाणार असून याकरता प्रशासनाने प्रयत्न सुरू केले असल्याची माहिती आचार्य विनोद शुक्ल यांनी दिली आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र पैंसिया आणि पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार यांच्या नेतृत्वात दीपा सराय भागात वीजचोरीच्या विरोधात मोहीम उघडण्यात आली होती. यादरम्यान अधिकारी दीपा सरायला लागून असलेल्या खग्गू सराय येथे पोहोचले होते. तेथे एका प्राचीन मंदिराला बंद आणि जर्जर स्थितीत पाहून सर्व जण दंग झाले होते. यासंबंधी माहिती मिळविण्यात आली असता तेथे काही हिंदू परिवारांचे वास्तव्य होते, परंतु 1978 च्या दंगलीनंतर त्यांनी या परिसरातून स्थलांतर केल्याचे समोर आले होते. ही माहिती मिळताच पोलीस-प्रशासनाने मंदिराचा दरवाजा उघडला होता, यानंतर गर्भगृहात भगवान हनुमान आणि शिव यांच्या मूर्ती आढळून आल्या. तर नजीकच एक विहिर बुझविण्यात आल्याचे कळताच तेथे खोदकाम हाती घेण्यात आले होते.
मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे
प्राचीन मंदिर समोर येताच प्रशासनाने तेथील सतर्कता वाढविली आहे. मंदिर परिसरात आता अनेक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनाने मंदिराचे गर्भगृह आणि परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. तर मंदिराच्या जीर्णोद्वारचे कार्य करविण्याचा प्रयत्न केला जात आहे.









