कोल्हापूर / बाळासाहेब उबाळे :
रेल्वेतून फुकट प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.रेल्वे तिकिट तपासणीसनकडून प्रवाशांची तपासणी करुन फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली जाते. मिरज – कोल्हापूर या मार्गावर धावणाऱ्या सर्व रेल्वे गाडयातून महिन्याला सुमारे 300 फुकटे आढळतात.तर दंडापोटी महिन्याला जवळपास एक लाख रुपये जमा होतात.रेल्वे प्रशासनाने कितीही कडक धोरण अवलंबले तरी फुकटे प्रवासी आढळतातच.
रेल्वेचा प्रवास परवडणारा आणि सुरक्षित आहे.यामुळे देशात कोठेही प्रवास करताना प्रवासी रेल्वेच्या प्रवासाला प्राधान्य देतात. यामुळे रेल्वेला कधीही प्रवाशांची गर्दी असते.इतकेच काय कित्येक मार्गावरील रेल्वेचे तिकिट मिळवणे सद्या जिकीरीचे होत आहे. त्यातही फुकट्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. रेल्वेच्या तिकिट तपासणीसाला सापडले तरच कारवाई होते. अन्यथा असे प्रवासी सहीसलामत प्रवास करुन निघून जातात.मिरज –कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या रेल्वेतही असे फुकटे प्रवासी कमी नाहीत.
मिरज कोल्हापूर एक्सप्रेस आणि पॅसेंजर अशा गाड्या धावतात.या सर्वच गाडयांना नेहमी गर्दी असते.कोल्हापूर येथील तिकिट तपासणीस मिरजेहून कोल्हापूर स्थानकात आलेल्या गाडीतील प्रवाशांच्या तिकिटाची तपासणी करतात. तर कोल्हापूरातून मिरजेला जाणाऱ्या गाडीतील प्रवाशांची मिरज तिकिट तपासणीस करतात.गाडी थांबल्यावर प्रवासी उतरले की तिकिट तपासणीस रेल्वेच्या स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नजर ठेवून येणाऱ्या प्रवाशांकडे तिकिटाची मागणी करतात. यावेळी प्रवाशाकडे तिकिट नसल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होते.
मोफत प्रवास करणारे असे प्रवासी रोजच आढळतात.मिरजहून कोल्हापूर स्थानकात येणाऱ्या सर्व गाड्यातून मिळून महिन्याला असे जवळपास 300 प्रवासी आढळतात.त्यांच्यावर शंभर रुपयापासून 300 रुपये दंडात्मक कारवाई केली जाते.त्याप्रमाणे वर्षाला साडेतीन हजार मोफत प्रवास करणाऱ्यावर कारवाई होते.तर 12 लाखाचा दंड वसूल होत असल्याचे तिकिट तपासणीसाने सांगितले.
- भिकाऱ्यांची संख्या मोठी
कोल्हापूर रेल्वे स्थानक हे शेवटचे स्थानक आहे. यामुळे अन्य राज्यातून तसेच मिरजेतून येणारे भिकारी कोल्हापूर स्थानकात उतरतात.त्यांच्याकडे तिकिटच नसते. तसेच मुळातच भिकारी असल्याने त्यांच्यावर कारवाई होत नाही. याचा गैरफायदा भिकारी घेतात. यामुळे भिकारी हे रेल्वेचे फुकटे प्रवासीच आहेत.
विनातिकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या निर्बंधासाठी रेल्वेचे तिकिट तपासणी आहेत.त्यांच्याकडून विनातिकट किंवा चुकीचे तिकीट असलेल्या प्रवाशावर तिकिट दराइतका किंवा 200 रुपये दंड होतो.तसेच रेल्वेच्या न्यायालयात त्यांना हजर करण्यात येते.
निला स्वप्निल – मुख्य जनसंपर्क अधिकारी,पुणे








