सुदैवाने जीवितहानी टळली : कुटुंबीयांचे मोठे नुकसान
वार्ताहर/मजगाव
मजगावात पाऊस व वाऱ्यामुळे जुन्या तीन घरांची पडझड झाली असून सुदैवाने प्राणहानी झाली नाही. येथील ब्रम्हदेव गल्लीतील रहिवासी जोतिबा देवेंद्र हंडे यांचे राहत्या घराची भिंत कोसळल्याने नुकसान झाले आहे. तसेच गणपत गल्ली मजगाव येथील रहिवासी विजय मऱ्याप्पा नाईक यांच्याही राहत्या घराची भिंत कोसळली आहे. तसेच गंगाई गल्लीतील रहिवासी पं. राजेंद्र पद्मनाथ उपाध्ये यांच्या राहत्या घराची माडीवरची भिंत कोसळली. सदर घरात उपाध्ये कुटुंबीय वास्तव्य करतात. पण दैव बलवत्तर म्हणून सर्वजण सुखरूप बचावले. भिंत पडताना मोठा आवाज झाला. त्यावेळी धो धो पावसात सर्व कुटुंब बाहेर आले आणि माडीवरची भिंत कोसळली. त्यामुळे सर्वांचेच नुकसान झाले आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.









