गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील तीन प्रमुख आरोपींना जामीन
कोल्हापूर : ज्येष्ठ विचारवंत गोविंदराव पानसरे यांच्या खून प्रकरणी अटकेत असलेल्या तिघांना मंगळवारी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये जामीन मंजूर करण्यात आला. डॉ. वीरेंद्र तावडे, शरद भाऊसाहेब कळसकर आणि अमोल अरविंद काळे या तिघांच्या जामीन अर्जावर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्यासमोर सुनावणी झाली.
याबाबत अधिक माहिती अशी, गोविंदराव पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्यावर १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. यावेळी दोन दुचाकीवरुन आलेल्या चार हल्लेखोरांनी पानसरे दाम्पत्यावर गोळीबार केला होता. पानसरे यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.
या घटनेत गंभीर जखमी झालेले पानसरे यांचा उपचारादरम्यान २० फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या होत्या. याप्रकरणी विशेष तपास पथकाने (एसआयटी) १२ संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला होता. यापैकी १० जणांना अटक झाली आहे. यापैकी सात जणांना यापूर्वीच जामीन मंजूर झाला. उर्वरित तिघांना जामीन मिळावा यासाठी त्यांच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. संशयित आरोपींना तपास यंत्रणांनी केवळ परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अटक केली आहे. ते गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहेत. त्यामुळे त्यांना जामीन मंजूर व्हावा, अशी मागणी संशयित आरोपींचे वकील अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी केली होती. डा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायमूर्ती डिगे यांनी वीरेंद्र तावडे, अमोल काळे आणि शरद कळसकर यांना जामीन मंजूर केला.
दोघांचा शोध सुरु, १० जणांना जामीन मंजूर
पानसरे खून प्रकरणी १२ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आजपर्यंत १० जणांना अटक केली आहे. तर सारंग आकोळकर आणि विनय पवार हे दोघे अद्याप फरार आहेत. या प्रकरणी १० संशयित आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपी समीर गायकवाड, सचिन अंदुरे, गणेश मिस्किन, अमित देगवेकर, अमित बद्दी, भारत कुरणे आणि वासुदेव सूर्यवंशी यांना दोन वर्षांपूर्वीच उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. वीरेंद्र तावडे यालाही जामीन मंजूर झाला होता. मात्र, फिर्यादींच्या वकिलांनी त्यावर आक्षेप घेतल्याने पुन्हा तावडे याला शरण येण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. आता तावडे याच्यासह काळे आणि कळसकर यांचा जामीन मंजूर झाला.








