प्रतिनिधी /वास्को
बायणातील उमेश हरीजन खून प्रकरणातील अन्य तीन आरोपींना गजाआड करण्यास मुरगाव पोलिसांना रविवारी रात्री यश आले. त्यांना रविवारी संध्याकाळी बेळगाव जवळ ताब्यात घेण्यात आले होते. जुम्मन शेख(28), परशुराम दोड्डामणी(25) व दुर्गेश मदार(28) अशी या संशयीत आरोपींची नावे असून ते वास्को बायणातीलच राहणारे आहेत. खूनाच्या घटनेनंतर ते फरार झाले होते.
मागच्या सोमवारी दुपारी काटे बायणातील सार्वजनिक गणेशोत्सवात सहभागी होऊन आपल्या एका मित्रासमवेत परत जाताना उमेश हरीजन(33) या युवकावर कोयता व सुऱयाने हल्ला करून पाच युवकांनी त्याची निघृण हत्या केली होती. पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाली होती. या घटनेनंतर पाचही संशयीत आरोपी घटनास्थळावर पळ काढला होता. मात्र, या पाच संशयीतांपैकी दीपक साहनी व आमीर हुसेन हे दोघे जुने गोवा येथे संध्याकाळी फोंडा पोलिसांच्या तावडीत सापडले. त्यांना पोलिसांनी बाणस्तारी ते जुने गोवे असा पाठलाग करीत पकडले होते. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
मात्र, जुम्मन शेख, दुर्गेश मदार व परशुराम दोड्डामणी हे तिघे संशयीत आरोपी गोव्याची सिमा ओलांडण्यास यशस्वी ठरले होते. त्यामुळे सोमवार ते शनिवारपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. परंतु मुरगाव पोलिसांना त्यांचा शोध जारीच ठेवला होता. मुरगावचे पोलीस निरीक्षक राघोबा कामत यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर संशयीत आरोपी कर्नाटकमधील बागलकोट शहरात असल्याची माहिती त्यांना खास सुत्रांकडून मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचे एक पथक बागलकोटकडे रवाना झाले होते. मात्र, या संशयीत आरोपींनी पोलिसांना हुलकावणी देण्यासाठी आपला मोर्चा बेळगावकडे वळला होता. बागलकोटमध्ये पोहोचताच संशयीत आरोपी बेळगावकडे रवाना झाल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी बागलकोटहून बेळगावचा रस्ता धरला. बेळगाव जवळच त्यांना तावडीत पकडण्यास पोलिसांना यश आले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास पोलिसांचे पथक त्या तिघांना घेऊन वास्कोत दाखल झाले व त्यांना गजाआड करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक राजेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मुरगाव पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









