कोल्हापूर / पूजा मराठे :
‘आईस स्टॉक‘ हा खेळ भारतीयांना थोडा नवखाच आहे. अर्थात, या खेळाचे नावही काहीजणांना परिचितही नसेल. युरोपमधील काही देशात खेळला जाणारा हा हा खेळ 2021 पासून भारतात आला. बघता बघता या खेळाला भारतीय खेळाडूंनी उचलून धरले. आणि आता अनेक खेळाडू या खेळाच्या आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशीपसाठी तयार झाले आहेत. यामध्येच कोल्हापूरचे प्रविणसिंह कोळी, यश जाधव सरनाईक आणि सौरीश साळुंखे हे तीन खेळाडू आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिपसाठी ऑस्ट्रीयाला निघाले आहेत. 22 फेब्रुवारीपासून या स्पर्धा सुरू होत आहेत. प्रविण हे सर्वसामान्य गटातून तर यश आणि सौरीश हे 23 वर्षाखालील गटातून भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
2021 पासून हा खेळ भारतीयांच्या परिचयात आला असूनही विविध शहारातून अनेक खेळाडूंनी या खेळाला मोठा प्रतिसाद दिला आहे. कोल्हापूरमधून सध्या 10 ते 15 खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवर खेळून पारितोषिक विजेते आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठातर्फेही दोन गट या खेळासाठी पाठविले जातात. यामधील बहुतांश खेळाडू हे राष्ट्रीय पातळीवरील आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर मिक्स म्हणजे एका संघात दोन मुले, दोन मुली यापद्धतीनेही खेळला जातो. भारतामध्ये वर्षातून दोन वेळा राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा भरविल्या जातात.

यंदा पहिल्यांदाच ऑल इंडिया युनिव्हर्सिटी चॅम्पियनशिप पार पडली. यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मुलींच्या गटाने जनरल चॅम्पियनशीप मिळविली. तर मुलांचा गट उपविजेता ठरला आहे. यामधील काही खेळाडू ‘खेलो इंडिया’ मध्ये पारितोषिक प्राप्त आहेत. यामध्ये शिवाजी विद्यापीठाची गायत्री लोळगे हीने खेळाडू राष्ट्रीय चॅम्पियनशीप, खेलो इंडिया, ऑल इंडिया युनिव्हर्सिटी अशा स्पर्धांमध्ये जेतेपद पटकावून कोल्हापूरचे नाव पुढे नेले आहे. खेळाडूंना या खेळासाठी लागणाऱ्या सुविधा सरकारकडून अजुनही पुरविल्या जात नसल्याने, खेळाडू स्वखर्चावर खेळत आहेत.
- काय आहे हा खेळ ?
हा खेळ दोन प्रकारे खेळला जातो. एक प्रकार आहे आईस स्टॉक आणि दुसरा प्रकार आहे समर स्टॉक. हा खेळ मल्टीपल इव्हेंटमध्ये खेळला जातो. टीम टारगेट, टीम गेम, टीम डिस्टंन्स, इंडीविज्वल डीस्टंन्स, इंडीविज्वल टारगेट असे यातील प्रकार आहेत. या खेळात चार सेट असतात. प्रत्येक खेळाडूला एक सेट खेळण्याची सहावेळा संधी मिळते. हा खेळपूर्ण पणे खेळाडूच्या पॉवर मॅनेजमेंट आणि एकाग्रतेवर अवलंबून आहे.
- आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे नाव पुढे नेण्यासाठी प्रयत्न करू
महाराष्ट्र टीम मध्ये माझ्यासह यश जाधव सरनाईक, सौरीश साळुंखे आणि श्रेयस कोळी असे आम्ही चार जण आहोत. सध्याच्या आमच्या स्कोरनुसार आम्ही अनबिटेबल (अजिंक्य) आहोत. मी सर्वात पहिल्यांदा श्रीनगर येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत खेळलो होतो. कोल्हापूरात आम्ही न्यू इंग्लिश मिडीयम स्कूलच्या स्केटींग ग्राऊंडवर आणि महासैनिक दरबार येथे आमची प्रॅक्टीस सुरु आहे. आमचे प्रॅक्टीस सकाळी 5.30 ते 9 या वेळेत असते. आम्ही या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी जोरदार तयारी करत आहोत. पण हा खेळ आम्ही पूर्णपणे स्वखर्चावर खेळत असल्याने आम्हाला बऱ्याच मर्यादा येत आहे. तरी आम्हाला कोल्हापूरकरांनी दातृत्त्व दाखविले तर आम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरही या खेळात कोल्हापूरच नाव पुढे आणण्यासाठी प्रयत्न करू.
– प्रविण कोळी, आईस स्टॉक, खेळाडू








