स्टार एअरकडून नवीन विमानफेरी सुरू, हैदराबादला 20 मे पासून सेवा
बेळगाव : बेळगाव-बेंगळूर या दरम्यान तिसरी विमान फेरी प्रवाशांना उपलब्ध झाली आहे. 1 मे पासून स्टार एअरने बेळगाव-बेंगळूर या मार्गावर आठवड्यातून तीन दिवस विमानसेवा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे विमान प्रवाशांना बेळगावहून बेंगळूरला जाण्यासाठी दिवसाला तीन विमान फेऱ्या उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी इंडिगो एअर लाईन्सकडून सकाळ व संध्याकाळी अशा दोन विमान फेऱ्या बेळगाव-बेंगळूर मार्गावर उपलब्ध होत्या. प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींची बेळगावहून बेंगळूरला ये-जा असल्याने या दोन्ही विमान फेऱ्यांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
त्याचाच आता स्टार एअरनेही विमानफेरी सुरू केली आहे. सोमवारी बेंगळूर येथून दुपारी 2 वाजता निघालेले विमान बेळगावला दुपारी 3.10 वाजता पोहोचेल. तर गुरुवार व रविवारी रात्री 9 वाजता बेळगावमधून निघालेले विमान रात्री 10.10 वाजता बेंगळूरला पोहोचेल. याचबरोबर बेळगाव-हैदराबाद या मार्गावर 20 मे पासून आठवड्यातून दोन दिवस विमानसेवा दिली जाणार आहे. 50 आसन क्षमता असलेले विमान स्टार एअरने उपलब्ध करून दिले आहे. इंडिगोकडून बेळगाव-हैदराबाद मार्गावर दैनंदिन विमानफेरी सुरू असून प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याने आता स्टार एअरनेही बेळगाव-हैदराबाद मार्गावर विमानफेरी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.









