खेड :
चार दिवसांपूर्वीच कोकण मार्गावरील राजापूर रोड ते विलवडेदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या बिघाडाची घटना ताज्या असतानाच मंगळवारी सायंकाळी 4.50 सुमारास कळंबणी–दिवाणखवटी रेल्वेस्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटून तीन एक्स्प्रेस रखडल्या. मांडवी एक्स्प्रेसच्या प्रवाशांची येथील स्थानकात 1 तास रखडपट्टी झाली. दिवाणखवटी रेल्वेस्थानकात थांबवलेली मडगाव –बांद्रा एक्स्प्रेस 50 मिनिटांनी मार्गस्थ झाली.
कळंबणी–दिवाणखवटी रेल्वेस्थानकादरम्यान ओव्हरहेड वायर तुटल्याची बाब गस्त घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास येताच रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविण्यात आले. त्यानुसार रेल्वेच्या इलेक्ट्रिकल विभागाची आपत्कालीन यंत्रणा तुटलेल्या ओव्हरहेड वायर जोडणी करण्यासाठी घटनास्थळी पोहोचली. कामामुळे 10116 क्रमांकाच्या मडगाव–बांद्रा एक्स्प्रेसला दिवाणखवटी रेल्वेस्थानकात थांबा देण्यात आला. 10104 क्रमांकाची मडगाव–सीएसएमटी मुंबई मांडवी एक्स्प्रेस येथील स्थानकात थांबवण्यात आली. स्थानकात थांबलेल्या मांडवी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांचा गोंधळ निर्माण होण्याची शक्यतेने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांनी तातडीने जादा पोलिसांची कुमक रेल्वे स्थानकात तैनात करत एक्स्प्रेस मार्गस्थ होईपर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता. ओव्हरहेड वायरची जोडणी होईपर्यंत एक्स्प्रेसचे प्रवासी स्थानकात खोळंबली. 12449 क्रमांकाची गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेसही आंजणी रेल्वेस्थानकात थांबवून ठेवण्यात आली होती. सायंकाळी उशिरापर्यंत इलेक्ट्रिक विभागाच्या आपत्कालीन यंत्रणेकडून मार्ग वाहतुकीसाठी पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू होते. या बिघाडामुळे सायंकाळच्या सुमारास मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम झाला.
- दोन तासांनी खोळंबलेल्या रेल्वेगाड्या मार्गस्थ
कोकण मार्गावर कळंबणी–दिवाणखवटी रेल्वेस्थानकादरम्यान तुटलेल्या ओव्हरहेड वायरच्या जोडणीचे काम मंगळवारी सायंकाळी 7 च्या सुमारास पूर्ण झाले. यानंतर त्या–त्या स्थानकात खोळंबलेल्या रेल्वेगाड्या मार्गस्थ होताच रखडलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.








