इम्तियाज मुजावर / पाचगणी :
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (shambhuraj desai) यांच्या सातारा जिल्ह्यात त्यांच्याच विभागामधील अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला असून, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तीन जणांवर (Three excise officer in Satara district caught in bribery scam) एसीबीचा सापळा रचून कारवाई करण्यात आली. तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी एक अधिकारी व दोन कर्मचारी यांना अटक करण्यात आली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सातारा विभागांमध्ये उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात उलटेपालटे धंदे कार्यालयातून सुरू असल्याने उत्पादन शुल्क विभागाच्या सातारा कराड कार्यालयाचा गोरख धंदा यानिमित्ताने उघड झाला.
उत्पादन शुल्क विभागाच्या दुय्यम निरीक्षकासह 2 जवान लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी तीन लाख रुपये लाच घेतल्याप्रकरणी कारवाई केली असून, तीन जणांवर लाच घेतल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यासंदर्भात सातारा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पर्यवेक्षण अधिकारी अशोक शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार बिअर शॉपी चे लायसन चे प्रकरण वरिष्ठ कार्यालयास पाठवण्यासाठी लोकसेवक दत्तात्रय विठोबा माकर, नितीन नामदेव इंदलकर सतीश विठ्ठलराव काळभोर ,यांनी बियर शॉपीचे लायसनसाठी वरचं कार्यालय मॅनेज करावे लागेल म्हणून तीन लाख रुपयाची लाच मागितली. याप्रकरणी तक्रार लाचलुचपत विभागाकडे करण्यात आली होती.
यावरून पोलीस उप अधीक्षक लाचलुचपत विभाग अशोक शिर्के यांनी आपल्या टीमसह सापळा लावला. लाच देण्यासाठी आलेले तक्रारदार व लाच घेणारे उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी सतीश विठ्ठलराव काळभोर दत्तात्रय विठोबा माकर नितीन नामदेव इंदलकर यांना रंगेहात पकडण्यात आले. यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला सातारा जिल्ह्यामध्ये उत्पादन शुल्क विभागाचे सगळ्यात मोठे कार्यालय आहे. या कार्यालयातून संपूर्ण सातारा जिल्ह्यातील बियर शॉपी बियर बार तसेच देशी दारू दुकान यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या काही जणांना अभय देत टेबल खालून घेण्याचे प्रकार वाढले असून, या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आता दुकानदार देखील वैतागले आहेत. त्यामुळे भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था सध्या दुकानदारांची झाली असून, या उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कोणाचा तरी अंकुश हवा आहे, अशी मागणी देखील होऊ लागली आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात अवैद्य दारू व्यवसाय देखील मोठ्या प्रमाणात फोफावला असून, उत्पादन शुल्क विभागावर आता कोणाचा अंकुश बसणार आहे की नाही असा सवाल देखील आता दुकानदाराकडून व सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होऊ लागला आहे.