जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांची कारवाई
वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा हे दहशतवाद आणि खोऱ्यातील दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करताना दिसत आहेत. दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या कारणावरून त्यांनी तीन सरकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय शनिवारी घेतला. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये जम्मू काश्मीर पोलीस दलातील एक हवालदारही असल्याचे सांगण्यात येत आहे. तो पोलीस दलात असूनही दहशतवाद्यांना इनपुट पुरवत असल्याचे स्पष्ट झाले होते. अन्य दोन कर्मचाऱ्यांमध्ये एक शिक्षक आणि दुसरा विभागात काम करणारा ऑर्डरली आहे. बडतर्फ करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे फिरदौस भट, निसार अहमद खान आणि अशरफ भट अशी आहेत.
सुरक्षा आढावा बैठकीनंतर एका दिवसात तीन कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचा निर्णय उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी घेतला आहे. त्या बैठकीत उपराज्यपालांसह पोलीस आणि सुरक्षा संस्थांचे उच्च अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत मनोज सिन्हा यांनी दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देशही दिले होते. दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना त्याची किंमत चुकवावी लागेल. असा गुन्हा जो कोणी करेल त्याला सोडले जाणार नाही. अशा लोकांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा काही महिन्यांपूर्वी उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिला होता. तसेच लष्कर आणि स्थानिक पोलिसांना दहशतवादी संघटनांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेशही दिले होते.









