जयपूर :
राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये शुक्रवारी पहाटे 4 वाजल्यानंतर भूकंपाचे तीन जोरदार धक्के जाणवले. भूकंपामुळे लोक खडबडून जागे झाले आणि त्यांनी आपापल्या घरातून आणि अपार्टमेंटमधून सुरक्षित आणि मोकळ्या ठिकाणी धावत आल्याचे चित्र बऱ्याचठिकाणी दिसून आले. शुक्रवारी पहाटे 4.38 वाजता पहिला धक्का बसल्यानंतर 15-17 मिनिटांत आणखी दोन भूकंपाचे धक्के अधूनमधून जाणवले. त्यामुळे लोक प्रचंड घाबरले होते. या धक्क्मयांची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार तीन हादरे बसले आहेत. सुरुवातीला 4:09 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता 4.4 रिश्टर स्केल होती. तर, 4:22 वाजता जाणवलेला दुसरा धक्का 3.2 तीव्रतेचा आणि 4:25 वाजता झालेला तिसरा हादरा 3.4 रिश्टर स्केला तीव्रतेचा होता. पहाटेच्या सुमारास झालेल्या या भूकंपामुळे बराच वेळ गोंधळाचे वातावरण होते. या भूकंपाच्या धक्क्यांनंतर दहशतीमुळे लोक घराबाहेरील मोकळ्या जागेत आले. आणखी एक भूकंप होण्याची शक्मयता असल्याने अनेक लोक तासभर बाहेरच राहिले. या नैसर्गिक आपत्तीदरम्यान नाहरगढच्या टेकडीवर दगड फुटल्यासारखा किंवा स्फोटासारखा आवाज झाल्याचेही काही स्थानिकांनी सांगितले. भूकंपानंतर जयपूर शहरातील रस्त्यांवर लोकांनी हनुमान चालिसाचे पठण सुरू केले. तसेच रामगंज मार्केटसह इतरत्र लोकांची गर्दी होती.









