पोटनिवडणुकीत 15 उमेदवारांचे भवितव्य सिलबंद
मतदारसंघनिहाय मतदान
- रेईश मागूश – 43.94 टक्के
- कुठ्ठाळी – 45.07 टक्के
- दवर्ली – 50.52 टक्के
मतमोजणी केंद्रे
- म्हापसा – पेडे येथील क्रीडा संकुल
- मडगाव – माथानी साल्ढाणा इमारत
- वास्को – बायणा येथील रवींद्र भवन
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील तीन जिल्हा पंचायतींसाठी रविवार दि. 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या पोटनिवडणुकीत एकुण 46.66 टक्के एवढे मतदान नोंद झाले आहे. त्याद्वारे 15 उमेदवारांचे भवितव्य सिलबंद झाले आहे. उद्या दि. मंगळवार 18 रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
उत्तर गोव्यातील रेईश मागूश आणि दक्षिण गोव्यातील कुठ्ठाळी व दवर्ली या तीन पंचायतींसाठी ही पोटनिवडणूक झाली. त्यात रेईश मागूशमध्ये 43.94 टक्के, कुठ्ठाळीत 45.07 टक्के तर दवर्लीत 50.52 टक्के मतदारांनी आपला हक्क बजावला. तिन्ही मतदारसंघात मिळून 55519 पैकी 25905 मतदारांनी मतदानात भाग घेतला.
रेईश मागुशमध्ये चौघांत चुरस
रेईश मागूश मतदारसंघात माजी झेडपी रुपेश नाईक यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. त्यात संदीप बांदोडकर, प्रगती पेडणेकर, साईनाथ कोरगावकर आणि राजेश दाभोळकर या चौघांनी नशीब आजमावले आहे.
दवर्लीत पाचजण रिंगणात
दवर्ली आणि कुठ्ठाळी या मतदारसंघातील झेडपी विधानसभा निवडणूक लढवून आमदार बनल्यामुळे तेथील जागा रिक्त झाल्या होत्या. दवर्लीत परेश नाईक, सिद्धेश भगत, लियोन रायकर, अँड्रू रिबेलो आणि मुर्तुजा शेख असे पाचजण रिंगणात होते.
कुठ्ठाळीत आमदारपत्नी रिंगणात
कुठ्ठाळी मतदारसंघात अपक्ष आमदार अँथनी वास यांनी पत्नी मेशीयाना वास यांना रिंगणात उतरवले होते. त्याशिवाय वालेंत बार्बोसा, लेज्ली गामा, जॉन डिसा हे त्यांचे प्रतिस्पर्धी होते.
पावसानंतर मतदारांची पाठ
सकाळी 8 वाजता मतदानास प्रारंभ झाला. दुपारपर्यंत संथ गतीने मतदान चालले. दुपारी 2 पर्यंत रेईश मागुशमध्ये 25.71 टक्के, दवर्लीत 30.57 टक्के आणि कुठ्ठाळीत 31.61 टक्के मतदान नोंद झाले. दुपारनंतर मतदानास थोडा वेग आला. परंतु काही ठिकाणी पावसाने हजेरी लावल्यामुळे उर्वरित लोक मतदान केंद्रांकडे फिरकलेच नाहीत. तिन्ही मतदारसंघात मिळून 74 मतदान केंद्रे स्थापन करण्यात आली होती.
संबंधित तालुक्यातील उपजिल्हाधिकाऱयांची निर्वाचन अधिकारी तर मामलेदारांची साहाय्यक निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्याशिवाय भरारी पथके आणि पुरक पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. त्यामुळे निवडणूक शांततेत पार पडली.









