पुणे / वार्ताहर :
पुण्यातील वाघोली येथील एका सोसायटीत एक दुर्दैवी घटना शुक्रवारी घडली. येथील मोझे कॉलेज रस्ता येथील सोलासिया सोसायटीच्या फेज दोन मधील एका इमारतीचे ड्रेनेजचे चेंबर साफ करत असताना 3 सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास घडली. घटनास्थळी पीएमआरडीएचे बचाव पथक पोहचले असून, तिघांचे मृतदेह ही चेंबरच्या बाहेर काढण्यात आले आहेत.
नितीन प्रभार गोंड (वय 45), गणेश भालेराव (वय 28, फकीर बाबा वस्ती, नांदेड), सतीशकुमार चुडाहरी (वाघोळी, डोमखेल वय 35) अशी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तीन सफाई कर्मचाऱ्यांची नावे आहेत.
अधिक वाचा : इम्रान खान यांना निवडणूक आयोगाचा दणका; 5 वर्षांसाठी ठरवलं अपात्र
पोलीस आणि पीएमआरडीएच्या अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी सकाळी 6 च्या सुमारास घडली. वाघोली येथील मोझे कॉलेज रस्तावर सोलासिया नावाची सोसायटी आहे. या सोसायटीच्या फेज 2 मधील एका इमारतीच्या ड्रेनेजच्या चेंबरच्या सफाईचे काम शुक्रवारी सकाळी सुरू होते. वरील तीन सफाई कर्मचारी हे ड्रेनेज साफ करण्यासाठी चेंबरमध्ये उतरले. मात्र, चेंबरमध्ये असलेल्या विषारी वायुमुळे तिघेही बेशुद्ध झाले. यामुळे तातडीने सोसायटीतील नागरिकांनी याची माहिती 7 वाजता पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्र आणि पोलिसांना दिली. पीएमआरडीए वाघोली अग्निशमन केंद्राचे जवान तातडीने हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी तिघांना बाहेर काढले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला होता. पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी घटनेचा पंचनामा केला. मृत सफाई कर्मचाऱ्यांचे मृतदेह ससून रुग्णालयात शविच्छेदनास पाठवण्यात आले.









