सावळज/वार्ताहर
सावळज व सिध्देवाडी येथील तीन कामगारांचा आंध्रप्रदेश राज्यामध्ये विषारी औषध पिऊनमृत्यू झाला आहे. शेतीच्या कामासाठी आंध्र प्रदेश येथील अनंतपूर या ठिकाणी गेलेल्या सावळज येथील दोघांनी व सिध्देवाडी येथील एकाने नशेसाठी अल्कोहोल मिश्रीत विषारी औषध पिल्याने गुरूवारी या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली आहे.
सावळज येथील सदाशिव कळे (वय ४३), दिपक जयसिंग शिरतोडे (वय ४४) व सिध्देवाडी येथील भरत नामदेव चव्हाण (वय ४२) हे आंध्रप्रदेशमधील अनंतपुर या ठिकाणी एका व्यापाऱ्याच्या द्राक्षशेतीत कामासाठी गेले होते. स्थानिक मजूरीपेक्षा जास्त पैसे मिळत असल्याने तेथेच राहून शेतीचे कामे करीत होती. मात्र गुरुवारी दारुच्या नशेसाठी या तिघांनी अल्कोहोल मिश्रीत विषारी औषध पिले असल्याचे समजते. मात्र काही तासांत या तिघांची प्रकृती बिघडली मात्र शेतातील घरात या तिघांशीवाय दुसरं कोण नसल्याने त्यांना वेळेत वैद्यकीय मदत मिळू शकली नाही.
घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी स्थानिक लोकांनी घटना स्थळी जाऊन पाहिल असता सिध्देवाडी येथील चव्हाण यांचा मृत्यू झाला होता तर इतर दोघांची प्रकृती गंभीर बनली होती. अशा स्थितीमध्ये थोडं-थोडं औषध पिले असल्याचे एकाने अत्यावस्थेत सांगितले आहे. यानंतर वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचे समजते. पण उर्वरित दोघांचाही मृत्यू झाला. गुरूवारी रात्री उशिरा ही दुर्दैवी घटना त्यांच्या कुटुंबीयांना समजली. एकाच दिवशी तिघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. शुक्रवारी सकाळी या तिघांचे शवविच्छेदन करण्यात आले.








