मध्यप्रदेश-राजस्थानसह 14 राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा
वृत्तसंस्था /रांची
देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये वेळेपूर्वी दाखल झाल्यानंतर मान्सून कमकुवत झाला आहे. त्यामुळे उत्तर आणि पूर्व भारतात पुन्हा उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू लागला आहे. झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे तिघांचा मृत्यू झाला. यातील एक मृत रामगढचा तर दोन जमशेदपूर येथील आहेत. दुसरीकडे, संततधार पावसामुळे सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात गुऊवारी दरड कोसळली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तसेच पाच जण बेपत्ता झाले. भूस्खलनामुळे अनेक रस्ते बंद झाले असून काही घरे पाण्याखाली गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा, झारखंड, दिल्ली, पंजाब आणि उत्तर राजस्थानमध्ये बुधवारी अनेक ठिकाणी 45 ते 47 अंशांच्या दरम्यान तापमानाची नोंद झाली. 47.5 अंश तापमानासह उत्तर प्रदेशमधील कानपूर शहर सर्वात उष्ण ठरले. देशातील 14 राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये उत्तर प्रदेश, उत्तराखंड, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश आणि ओडिशा या राज्यांचा समावेश आहे. मान्सून पुढील 8-10 दिवस वेगाने पुढे सरकण्याची शक्मयता नाही. 16 ते 18 जूनदरम्यान बिहार आणि झारखंडमध्ये मान्सून पोहोचू शकतो. तसेच 20 ते 30 जूनदरम्यान उत्तर प्रदेश आणि 27 जूनच्या सुमारास दिल्लीला पोहोचणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली.









