सोमवारनंतर समस्यांवर घडणार चर्चा
बेळगाव : उत्तर कर्नाटकाच्या विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी अधिवेशनाच्या उत्तरार्धात तीन दिवस राखीव ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी दुपारी सभाध्यक्षांच्या कार्यालयात झालेल्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून यंदा नियोजित वेळेपेक्षा एक दिवस आधीच अधिवेशनाचे सूप वाजणार आहे. भोजनविरामानंतर सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी विधानसभेत यासंबंधीची घोषणा केली. 20 डिसेंबर रोजी मंड्या येथे अखिल भारतीय कन्नड साहित्य संमेलन होणार आहे. या पार्श्वभूमीवर 19 डिसेंबर रोजी एक दिवस आधी अधिवेशन आटोपते घेण्यात येणार आहे. उत्तर कर्नाटकाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सोमवार दि. 16 डिसेंबरपासून तीन दिवस राखीव ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एक दिवस आधी अधिवेशन संपणार आहे. त्यामुळे रोजचे कामकाज सकाळी 11 ऐवजी 10 पासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून मंगळवारी विविध विधेयके मांडण्यात येणार आहेत. सर्व आमदारांनी बदलते वेळापत्रक लक्षात घेऊन अधिवेशनात भाग घेण्याचे आवाहन सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी केले.
सभाध्यक्षांचे आसन कसे असावे?
सभाध्यक्षांसाठी नवे आसन तयार करण्यात आले आहे. सभाध्यक्ष यु. टी. खादर यांनी विधानसभेत यासंबंधीची माहिती दिली. सभाध्यक्षपदाला एक घटनात्मक महत्त्व आहे. त्या आसनालाही तितकेच महत्त्व आहे. बेंगळूर येथील विधानसौधच्या धर्तीवर सुवर्णसौधमध्येही सभाध्यक्षांसाठी नवे आसन तयार करण्यात आले आहे. विधानसौधचे शिल्पकार कै. केंगल हनुमंतय्या यांना यासंबंधी एक स्पष्ट कल्पना होती. सभाध्यक्षांचे आसन कसे असावे? हे कलाकारांना सांगून त्यांनी आसन बनवून घेतले होते. या धर्तीवर राष्ट्रकुट, होयसळ आदी राजवटींमधील चिन्हे ही या आसनात आहेत. सूर्य-चंद्र आहेत. शिमोगा येथे मिळालेल्या उत्तम दर्जाच्या लाकडाचा यासाठी वापर करण्यात आल्याचे सभाध्यक्षांनी सांगितले.









