फसवणुकीचा तपशील घेणार जाणून : अद्याप दोघे फरारी
प्रतिनिधी/ बेळगाव
ऑटोनगर येथील ट्रान्स्पोर्ट कंपनीला 32 लाखांचा गंडा घातल्याच्या आरोपावरून माळमारुती पोलिसांनी अटक केलेल्या उत्तरप्रदेश व बिहारमधील त्रिकुटाला पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे. त्यांची कसून चौकशी करण्यात येत असून त्यांनी ही फसवणूक कशी केली? याचा तपास केला जात आहे.
प्रदीप रामदुलारे सिंग (वय 30) रा. कम्पूर, मोहम्मदाबाद, जि. महू, उत्तरप्रदेश, संजयकुमार श्रीयुत यादव (वय 43) रा. बावरा बुदाम, ता. सैदपूर, जि. गाजीपूर, उत्तरप्रदेश, कमलेश योगेंद्र ठाकुर (वय 49) रा. सनहापूर, जि. दरभंगा, बिहार अशी त्यांची नावे आहेत. गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी या त्रिकुटाला अटक करण्यात आली होती.
माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, पोलीस उपनिरीक्षक श्रीशैल हुळगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. या त्रिकुटाने अन्य दोघा जणांच्या मदतीने आपण काम करीत असलेल्या टीसीआय या ट्रान्स्पोर्ट कंपनीला 32 लाख 8 हजार 885 रुपयांना फसविले आहे. कंपनीच्या व्यवहारातून आलेली रक्कम कंपनीच्या खात्यात जमा न करता त्यांनी स्वत:च्या खात्यात जमा करून घेतली आहे.
फसवणुकीचा हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बेंगळूर येथील लवकेशकुमार लक्ष्मीनारायणस्वामी साहू यांनी 4 एप्रिल रोजी माळमारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. उत्तरप्रदेश व बिहारला पोलीस पथके पाठवून या तिघा जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या असून याकामी त्यांना सौरभ नरेंद्र मिश्रा व देवेंद्र दलबीर यांची मदत लाभली आहे. हे दोघे फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. सध्या अटकेत असलेल्या त्रिकुटाला न्यायालयाची परवानगी घेऊन शनिवारी तीन दिवसांच्या पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.









