नेहरुनगर, विश्वेश्वरय्यानगर, सांबरा येथील घटनांनी हळहळ
बेळगाव : बेळगाव शहर व तालुक्यात मंगळवारी एका दिवसात दोन विद्यार्थिनींसह तिघी जणींनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. खासगी कंपनीत प्रशिक्षणासाठी आलेल्या विजापूर येथील एका तरुणीने आपण राहत असलेल्या नेहरुनगर येथील पीजीमध्ये आत्महत्या केली आहे, तर दहावीचा पेपर व्यवस्थित न गेल्यामुळे एका विद्यार्थिनीने विश्वेश्वरय्यानगर येथे गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. तिसरी घटना सांबरा येथे उघडकीस आली असून बीएस्सीत शिकणाऱ्या एका तरुणीने आत्महत्या केली आहे.
एपीएमसी व मारिहाळ पोलीस स्थानकात या तिन्ही घटनांची नोंद झाली आहे. पीजीमध्ये आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या मृत्यू प्रकरणात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणीच्या पीजीला भेट देणाऱ्या एका तरुणाचा शोध घेण्यात येत आहे. यासाठी एक पोलीस पथक नियुक्त करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली. इब्राहिमपूर, विजापूर येथील ऐश्वर्यलक्ष्मी मेलप्पा गलगली (वय 24) या एमबीएचे शिक्षण पूर्ण केलेल्या
तरुणीने पहिला क्रॉस, नेहरुनगर येथील आपण राहत असलेल्या पीजीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मंगळवार दि. 25 मार्च रोजी सायंकाळी 6 ते 8 यावेळेत साई बिल्डींगमध्ये ही घटना घडली आहे. बुधवारी विजापूर येथील तिचे कुटुंबीय बेळगावात आल्यानंतर त्या तरुणीच्या मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यात आली.
उपलब्ध माहितीनुसार एका खासगी कंपनीत प्रशिक्षणासाठी ऐश्वर्यलक्ष्मी जानेवारीत बेळगावला आली. नेहरुनगर येथील पीजीमध्ये ती राहत होती. मंगळवार दि. 25 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता ती आपल्या रूममध्ये परतली. रात्री 8 वाजण्याच्या सुमारास तिने फोन उचलला नाही म्हणून एक तरुण त्या पीजीत पोहोचला. त्याने बाहेरून दरवाजा ठोठावला. आतून कडी लावण्यात आली होती. त्याने दरवाजा ढकलून खोलीत प्रवेश केला. त्यावेळी ऐश्वर्यलक्ष्मीने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.
ऐश्वर्यलक्ष्मीने आत्महत्या केल्याचे लक्षात येताच तिचा फोन घेऊन तो तरुण तेथून पसार झाला आहे. त्यामुळेच यासंबंधी एपीएमसी पोलीस स्थानकात आई पार्वती गलगली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. प्रेम प्रकरणातून ही घटना घडली असावी, अशी प्राथमिक माहिती असून पीजीत शिरलेल्या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतरच अधिक माहिती उघडकीस येणार आहे.
बीएस्सीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
महादेवनगर, सांबरा येथील एका विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. जान्हवी राजू पाटील (वय 22) असे तिचे नाव आहे. ती बीएस्सी शेवटच्या वर्षात शिकत होती. तिचे आईवडील नोकरीनिमित्त हासन जिल्ह्यातील चन्नरायपट्टण येथे राहतात. जान्हवी आपल्या नातेवाईकांकडे राहत होती. 22 मार्चच्या सायंकाळी 5 पासून 24 मार्चच्या सायंकाळी 5 या वेळेत तिने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तिची मानसिक स्थिती ढासळली होती. 22 मार्च रोजी तिने हासन जिल्ह्यातील आपल्या कुटुंबीयांशी शेवटचे संभाषण केले होते. या घटनेचे निश्चित कारण समजू शकले नाही. मारिहाळचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक पुढील तपास करीत आहेत.
विश्वेश्वरय्यानगरमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या
विश्वेश्वरय्यानगर येथील फॉरेस्ट क्वॉर्टर्समध्ये एका दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आपले जीवन संपविले आहे. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. दीपिका राजेंद्र बडीगेर (वय 16) असे त्या दुर्दैवी विद्यार्थिनीचे नाव आहे. दहावीची परीक्षा व्यवस्थित गेली नाही म्हणून तिने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. एपीएमसी पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे.









