अंत्रोळी / समीर शेख :
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी व कंदलगाव सीमेवर विषबाधेने तीन जनावरे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही जनावरे येथील शेतकरी येसप्पा पांडुरंग सलगरे यांची असून, त्यांनी ही माहिती दिली.
शेतकरी सलगरे यांनी सकाळी सुमारे 10 वाजता आपली 11 जनावरे चरण्यासाठी अंत्रोळी–कंदलगाव सीमेवरील माळराणावर सोडली होती. त्याठिकाणी जनावरांनी गवत खाल्ल्यानंतर तेथे साखर कारखान्याची मळी सोडलेले पाणी प्यायले. त्यानंतर सुमारे 12 वाजता ही जनावरे परत आणून घरासमोर बांधल्यानंतर त्यांना त्रास सुरू झाला.
शेतकऱ्याने तातडीने कंदलगाव येथील पशुधन पर्यवेक्षक बालाजीराव गावडे यांच्याशी संपर्क साधला. गावडे पंधरा मिनिटांत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विषबाधेची लक्षणे ओळखून वरिष्ठ डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच तीन जनावरे दगावली. उर्वरित आठ जनावरांवर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले.
पशुधन विकास अधिकारी डॉ. पांगे, सहाय्यक अधिकारी डॉ. पवार, डॉ. बडंगे आणि फिरते पशुवैद्यकीय पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या वेळेवर उपचारांमुळे उर्वरित जनावरे सध्या स्थिर अवस्थेत आहेत.
यानंतर मृत जनावरांचे पोस्टमार्टम करण्यात आले. पशुधन अधिकाऱ्यांनी सांगितले की, जनावरांच्या लक्षणांवरून व प्राथमिक पोस्टमार्टम अहवालानुसार ही विषबाधा चाऱ्यामधून झाल्याचा संशय आहे. मृत जनावरांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार असून, त्या अहवालावरून अंतिम निष्कर्ष निघेल व त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.








