हेरवाडकर शाळेसमोरील घटना
बेळगाव : दुरुस्तीसाठी गॅरेजमध्ये उभ्या करण्यात आलेल्या तीन कार आगीत भस्मसात झाल्या आहेत. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास टिळकवाडी येथील हेरवाडकर हायस्कूलसमोर घटना घडली आहे. अज्ञातांनी जवळच पालापाचोळा पेटविला होता. आंब्याचे झाड असल्यामुळे सर्वत्र पाला पसरला होता. त्यामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती समजताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. बंब पोहोचेपर्यंत तीन कार जळून खाक झाल्या. जवानांनी पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणली. यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकाशी संपर्क साधला असता अद्याप कोणीच फिर्याद देण्यासाठी पोलीस स्थानकात आले नाही. आम्हीही घटनास्थळाची पाहणी केली आहे. फिर्याद दाखल झाल्यानंतरच नुकसानीची निश्चित माहिती समजणार असल्याचे त्यांनी सांगितले.









