भारतीय सैन्यही सतर्क ः हिवाळय़ाच्या पार्श्वभूमीवर विशेष तयारी
वृत्तसंस्था / लेह
चीनसोबतच्या 3,488 किलोमीटर लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आता घडामोडींना वेग येऊ लागला आहे. चीनच्या सैन्याने या एलएसीवर स्वतःच्या तीन संयुक्त सशस्त्र ब्रिगेड्सना तैनात केले आहे. भारत आणि चीन सीमेवरील तणाव अद्याप कायम आहे. चिनी सैन्य यावेळी स्वतःच्या वेस्टर्न थिएटर कमांडला मजबूत करत आहे. पीपल्स लिबरेशन आर्मीच्या वेस्टर्न थिएटर कमांडकडेच भारताला लागून असलेल्या सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी आहे.
चीनने तीन संयुक्त सशस्त्र ब्रिगेडना एलएसीवर तैनात केले आहे. भारतीय सैन्यासाठी हा चिंतेचा विषय ठरू शकतो. कडाक्याच्या थंडीत चीनच्या या सैन्य ब्रिगेड स्वतःच्या तळांवर परतणार का तेथेच तैनात राहणार यावर भारतीय सैन्याचा निर्णय अवलंबून राहणार असल्याचे मानले जात आहे. एलएसीवर शांतता आणि स्थैर्य द्विपक्षीय संबंधातील तणाव दूर करण्याचे एकमात्र साधन असल्याचे विदेशमंत्री एस. जयशंकर यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे.
मे 2020 मध्ये पूर्व लडाखमध्ये पीएलएच्या घुसखोरीनंतर दोन्ही देशांच्या संबंधांना धक्का पोहोचला होता. चीन एलएसीवर पायाभूत सुविधांची निर्मिती करत आहे. बळकावलेल्या अक्साई चीनमध्ये पीएलए सैनिकांच्या संख्येत कुठलीच घट झाली नसल्याचे भारतीय सैन्यप्रमुख मनोज पांडे यांनी म्हटले होते. दोन्ही देशांदरम्यान सैन्य स्तरावर आता 17 व्या फेरीतील चर्चा होणार आहे.
सिलीगुडी कॉरिडॉरनजीक चिनी ब्रिगेड
हिवाळय़ादरम्यान चीनच्या या ब्रिगेड स्वतःच्या तळांवर परतणार की पश्चिम थिएटर कमांडच्या क्षेत्रांमध्ये तैनात राहणार यावर भारतीय सैन्य पुढील पाऊल उचलणार असल्याचे मानले जात आहे. प्रत्येक ब्रिगेडमध्ये 4500 सैनिक सामील आहेत. एका संयुक्त सशस्त्र ब्रिगेडला चीन-भूतान सीमेवर सिलीगुडी कॉरिडॉरच्या जवळ फरी दजोंग क्षेत्रानजीक तैनात करण्यात आले आहे. दोन अन्य ब्रिगेड अरुणाचल प्रदेशला लागून असलेल्या सीमेवर चीनकडून तैनात केले गेले आहे.
अक्साई चीनमध्ये वाढविले बळ
चीनने बळकाविलेल्या अक्साई चीनमध्ये पीएलएने तैनात वाढविली आहे. यात रॉकेट, आर्मर, आर्टिलरी आणि क्षेपणास्त्रांसह सैन्याच्या दोन तुकडय़ा तैनात केल्या आहेत. होतान, काशगर, ल्हासा आणि न्यिंगजी वायुतळावर लढाऊ विमानांसह गार गुंसा वायुतळावर चीनचे वायुदल तैनात आहे. तर भारतीय सैन्य देखील पूर्व लडाखमध्ये अत्याधुनिक शस्त्रास्त्र यंत्रणांसह सज्ज आहे.
भारताचीही तयारी पूर्ण
भारताने पँगोंग सरोवरात नवे लँडिंग क्राफ्ट तसेच गस्तनौका तैनात केल्या आहेत. 135 किलोमीटर लांबीच्या पँगोंग सरोवराचा एक हिस्सा चीनच्या ताब्यात आहे. लेहपासून 54 किलोमीटर अंतरावर हे सरोवर आहे. लँडिंग क्राफ्टमध्ये 35 सैनिक किंवा एक जीप आणि 12 जवान सामावू शकतात. देखरेखीसाठी खरेदी करण्यात आलेल्या स्पीड बोट्स 35 सागरी मैल प्रतितासापर्यंतचा वेग गाठू शकतात.









