सोमशेखर, हेब्बार, एच. विश्वनाथ यांची हजेरी : राजकीय वर्तुळात चर्चा
बेळगाव : सुवर्णसौधमध्ये विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हे अधिवेशन आता शेवटच्या टप्प्यात आहे. दरम्यान शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये काँग्रेसच्या आमदारांच्या भोजनावळीत भाजपच्या तीन आमदारांनी हजेरी लावल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला ऊत आला आहे. बेळगाव शहराबाहेरील एका रिसॉर्टमध्ये बुधवारी रात्री काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. त्यानंतर आमदारांसाठी भोजनावळीचे आयोजन केले होते. त्यात भाजपचे विधानसभेतील आमदार एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार आणि विधानपरिषद सदस्य एच. विश्वनाथ सहभागी झाले होते. काँग्रेस आमदारांच्या भोजन कार्यक्रमात हे आमदार सहभागी झाल्याने उलटसुलट चर्चा होत आहे. हे नेते लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर काँग्रेस प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, याविषयी या नेत्यांनी अद्याप घोषणा केलेली नाही. परंतु ते काँग्रेस नेत्यांच्या संपर्कात असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. राज्यात युतीचे सरकार असताना काँग्रेसमधून एस. टी. सोमशेखर आणि शिवराम हेब्बाल व निजदमधून एच. विश्वनाथ हे बाहेर पडत भाजपप्रवेश केला होता. परिणामी युतीचे सरकार अल्पमतात येऊन कोसळले होते. भाजप सत्तेवर आल्यानंतर एस. टी. सोमशेखर व शिवराम हेब्बार पोटनिवडणुकीत निवडून येऊन मंत्री बनले होते. तर विश्वनाथ यांना विधानपरिषदेवर आणण्यात आले. मागील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर सोमशेखर आणि हेब्बार पुन्हा काँग्रेसकडे आकर्षित झाले. बेळगावमधील अधिवेशनावेळी भाजपने केलेल्या सभात्यागामध्ये सोमशेखर व हेब्बार सहभागी झाले नाहीत. भाजपमध्ये आपल्याला मान दिला जात नसल्याचे या दोघांचे म्हणणे आहे. एच. विश्वनाथ यांचीही हीच स्थिती असून त्यांनी भाजप नेत्यांवरच सातत्याने टीका केली आहे. तिन्ही नेत्यांचा कल काँग्रेसकडे असून त्यांच्या पुढील वाटचालीविषयी कुतूहल निर्माण झाले आहे.
पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन नाही : आर. अशोक
काँग्रेस आमदारांच्या भोजनावळीत भाजपचे एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार सहभागी झाल्याची माहिती मिळाली आहे. हे पक्षाच्या शिस्तीचे उल्लंघन नाही. केवळ भोजनावळीत सहभागी झाले आहेत. सोमशेखर यांनी मला याविषयी सांगितले आहे, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी दिली आहे. आपण हेब्बार आणि एच. विश्वनाथ यांच्याशीही चर्चा करेन. मागील तीन महिन्यांपासून अशा घटना घडत आहेत. काहीही असेल तरी सर्वांशी बोलून समस्या सोडविण्यात येईल. ते भोजनावळीत सहभागी झाले म्हणून शिस्तीचे उल्लंघन झाले, असे म्हणणे चुकीचे ठरेल, असेही अशोक यांनी सांगितले.
बैठकीला नव्हे; भोजनावळीसाठी आले – डी. के. शिवकुमार
भाजपचे आमदार एस. टी. सोमशेखर, शिवराम हेब्बार काल रात्री काँग्रेसच्या विधिमंडळ बैठकीत आले नव्हते. भोजन कार्यक्रमाला आले होते. सोमशेखर, हेब्बार यांच्यासह अन्य पक्षातील दहा आमदार आले होते. ते विधिमंडळ पक्षाच्या बैठकीसाठी कशाला येतील? आमच्या निमंत्रणावरून भोजन कार्यक्रमात सहभागी झाले, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिले.









