लॉटरी या प्रकारचे वेड जगभरात बहुतेकांना आहे. तथापि, लॉटरीची तिकिटे काढलेल्या बहुतेकांना ती लागत नाही, असे दिसून येते. लक्षावधी किंवा कोट्यावधी लोकांमधून एखाद्याचे भाग्य त्यासंबंधात फळफळते. तथापि, तो भाग्यवान मीच का ठरणार नाही, या भावनेने शेकडो कोटी लोक नित्यनेमाने लॉटरीच्या या खेळात भाग घेत असतात. एकदा का ती लागली की आपल्या आयुष्याची ददात मिटली. नंतर मौजमजा करण्याखेरीज काही करायचे नाही, असे अनेकांनी ठरविलेले असते.
तथापि, एका लॉटरी विजेत्याची कहाणी काही वेगळीच आहे. या अनामिक विजेत्याला 3 अब्ज 20 कोटी रुपयांचा जॅकपॉट लागल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे तो जगातील सर्वात सुखी आणि भाग्यवान माणूस आहे असे लोक समजू लागले होते. तथापि, या घटनेमुळे आपले आयुष्य उध्वस्त झाले असे तो मानतो. आपण अचानक असे श्रीमंत झाल्याने आपले नातेवाईक आपल्यापासून दुरावले. मित्रपरिवारही आपल्याशी फटकून वागतो. तसेच जरी 3 अब्जाहून अधिक रकमेचा जॅकपॉट लागला असला तरी हे सगळे पैसे एकमुष्ट आपल्या हाती ठेवण्यात आलेले नाहीत. आपल्याला वर्षाकाठी साधारणत: चार कोटी रुपये दिले जातात. अर्थात, तेव्हढ्या रकमेवर आपण आरामात जगू शकतो. सुखोपभोग घेऊ शकतो. पण आपले पूर्वीचेच जीवन अधिक चांगले होते, असे त्याचे स्पष्ट मत आहे. एवढी मोठी रक्कम दरवर्षी हाती येऊनही आपण एकांताच्या दु:खातून बाहेर येण्यासाठी प्रतिदिन 9 ते 5 या वेळेत नोकरी करतो. मन रमविण्यासाठी ती आवश्यक आहे. लॉटरी लागल्यानंतर आपले मित्र आणि नातेवाईक यांची आपल्याकडे पाहण्याची दृष्टी वेगळी झाली. ते माझ्याकडे सारखे पैसे मागू लागले. मी ते देण्यास नकार दिल्याने त्यांनी माझ्याशी संबंधच तोडले. पूर्वी पैसा नव्हता, तेव्हा असा त्रास नव्हता. त्यामुळे आपण सुखात आहोत ही जी समजूत पसरलेली आहे, ती अत्यंत चुकीची आहे, असे त्याचे म्हणणे आहे. थोडक्यात, ‘समुद्री चौकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही’ अशी त्याची स्थिती झाली आहे.









