चार फरार आरोपीच्या शोधासाठी दोन पथके
जत, प्रतिनिधी
समाईक विहिरीतील गाळ का काढू दिला नाही व पाण्याच्या पाळीवरून जत तालुक्यातील कोसारी येथे चुलता व पुतण्याचा दुहेरी खून केला करून पाच जणावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली होती. यात दोघांचा खून व पाच जणांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सात जणावर गुन्हा दाखल झाला आहे. तर यातील शिवाजी बाबा यमगर, आनिल तानाजी यमगर, सुनील तानाजी यमगर या तिघांना पोलिसांनी अटक करून न्यायालय समोर उभा केले असता न्यायालयाने २४ मार्चपर्यंत पोलीस कोठडी ठोठावली आहे.
दरम्यान, या खून प्रकरणातील तानाजी बाबा यमगर, धनाजी बाबा यमगर, (रा. कोसारी) शहाजी बिरा सोलंनकर , जनाबाई बिरा सोलंनकर (रा. शेगाव) हे अद्याप फरार आहेत. आरोपीच्या शोधार्थ पोलीसाची दोन पथके रवाना झाली आहेत. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पथक आरोपीच्या मागावर आहेत. दरम्यान शनिवारी सायंकाळी जिल्हा पोलीस प्रमुख बसवराज तेली यांनी घटनास्थळी भेट देत तपास कसून करण्याचा सूचना दिल्या होत्या.
कोसारी येथील महानूर वस्ती येथे भावकितीलच यमगर यांच्या समाईक विहिरीतील गाळ काढण्याचा व मालकी हक्कावरून दोन कुटुंबियांमध्ये वाद होता. तानाजी बाबा यमगर व त्याच्या साथीदाराने शनिवारी सकाळी गाळ काढण्याच्या कारणावरून प्रशांत दादासो यमगर व विलास नामदेव यमगर या दोघांवर चाकू कुऱ्हाडीने हल्ला चढवला. यात दोघेही जागीच ठार झाले होते. त्यानंतर प्रवीण विलास यमगर, जयश्री विलास यमगर, बाळाबाई यमगर ,निकिता यमगर, प्रियंका यमगर यांच्यावर हल्ला चढवला यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे करीत आहेत. फिर्याद प्रवीण यमगर यांनी दिली आहे.