मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिस खडबडून जागे : पंचायतीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडून जप्त,नरकासुराच्या रात्रीच्या ‘साईड इफेक्ट’मुळे तणाव
वाळपई : होंडा येथे दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासुर मिरवणुकीतील कर्णकर्कश आवाजाविरोधात तक्रार दाखल करणाऱ्या रुपेश पोके यांच्यावर पोलिसचौकीतच झालेला प्राणघातक हल्ला आणि त्यांची चारचाकी गाडी जाळण्याचा प्रयत्न, या दोन्ही प्रकारांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गंभीर दखल घेतली असून कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काल मंगळवारी सकाळपासून पोलिसांनी तपासाला गती देताना संशयितांची धरपकड सुरु केली आणि तिघांना अटक केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.रुपेश पोके यांची तक्रार पोलिसांनी नोंदवून घेतलेली आहे. उत्तर गोव्याचे पोलिस अधीक्षक अलोक कुमार, डिचोली पोलिस उपधीक्षक श्रीदेवी व इतर अधिकाऱ्यांनी होंडा पोलिसस्थानकावर भेट देऊन प्रकरणाचा आढावा घेतला.
कर्णकर्कश आवाजामुळे घडला प्रकार
होंडा येथे रविवारी संध्याकाळी सुरु असलेल्या नरकासुर मिरवणुकांमधील कर्णकर्कश आवाजाविरोधात तेथील रुपेश पोके यांनी स्थानिक पोलिसचौकीत तक्रार दिली होती. त्या आवाजाचा आपल्या कुटुंबाला व शेजाऱ्यांना त्रास होत असल्याचे त्यात म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आवाज बंद केला होता. मात्र रात्री 10.30 वा. पुन्हा कर्णकर्कश आवाजाला सुऊवात केल्याने ऊपेश पोके यांनी लेखी तक्रार वाळपई पोलिसस्थानकावर दिली. यामुळे संतप्त बनलेल्या नरकासुरप्रेमींनी होंडा पोलिसचौकीवर धाव घेऊन गोंधळ घातला. त्यावेळी ऊपेश पोके चौकीत होते. त्यांची चारचाकी गाडी बाहेर उभी होती. जमावाने गाडीची नुकसानी करुन आग लावण्याचा प्रयत्न केला.
मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर पोलिस जागे
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना पणजी येथे पत्रकारांनी होंडा येथील या प्रकरणासंदर्भात प्रश्न केला असता त्यांनी, कुणाचीही गय केली जाणार नसल्याचे स्पष्ट केले. संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्यानंतर स्थानिक पोलिसयंत्रणा खडबडून जागी झाली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकीला भेट
मंगळवारी दुपारी उत्तर गोवा पोलिसस अधीक्षक अलोक कुमार व उपअधीक्षक श्रीदेवी यांनी होंडा पोलिसचौकीला भेट देऊन एकूण प्रकरणाचा सविस्तरपणे आढावा घेतला. घडलेले प्रकरण व त्यानंतर पोलिसांनी केलेली कारवाई यावर सविस्तरपणे चर्चा केली.
सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात
दिवाळीच्या पूर्वसंध्येला होंडा पोलिसचौकीसमोर गाडीला आग लावण्याचा प्रकार व पोलिस इमारतीवर दगडफेकीचे सीसीटीव्ही फुटेज पंचायतीमधून अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस अधीक्षकांनी पंचायतीच्या कार्यालयात जाऊन सदर सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. काहींनी पंचायतीमधील सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरल्याचे उघड झाले.
तक्रारीत नावे असलेल्यांना सोडून इतरांचीच पोलिसांकडून सतावणूक
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार अनेकांची धरपकड सुरु केली आहे. मंगळवारी रात्रीपर्यंत 9 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिघांना अटक केल्याची माहिती देण्यात आली. ज्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे, त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांचा तपास म्हणजे जनतेच्या डोळ्dयात धूळफेक असल्याचा आरोप केलेला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ऊपेश पोके यांनी ज्यांची नावे तक्रारीमध्ये नमूद केलेली आहेत, त्यांना सोडून पोलिस इतरांना पकडत आहे. जोपर्यंत प्रमुख आरोपींना पकडण्यात येत नाही तोपर्यंत पोलिसांची भूमिका संशयास्पद असण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही.
शिवदास माडकर, कृष्णा गावकरसह सात जणांवर गुन्हा
वाळपई पोलिसांनी मंगळवारी रात्री होंडाचे सरपंच शिवदास माडकर, पंच सदस्य कृष्णा गावकर व अन्य 7 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. प्राणघातक हल्ला करणे, गाडीची तोडफोड करणे तसेच पोलिस चौकीच्या इमारतीवर दगडफेक करण्यासंदर्भात गुन्हा दाखल केलेला आहे. त्यांना लवकरात अटक होण्याची शक्यता आहे. पोलिस त्यांचा शोध घेत असल्याचे समजते. मात्र प्राप्त माहितीनुसार गुन्हा दाखल केलेले सर्वजण अज्ञात ठिकाणी पसार झाल्याचे समजते. पोलिस त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. वाळपई पोलिसस्थानकाच्या उपनिरीक्षक सनिक्षा नाईक या संदर्भात निरीक्षक विदेश रेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत आहेत.
आरोग्यमंत्र्यांकडून कडक कारवाईचे निर्देश
आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी या प्रकरणाची गंभीर दाखल घेतली असून यात गुंतलेल्या सर्वांना गजाआड करण्याची सूचना त्यांनी पोलिसांना केली आहे. या संदर्भात त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा केल्याची समजते. होंडा भागामध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न कदापी खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा मंत्र्यांनी दिलेला आहे.
पंचायत इमारतीला पोलिस संरक्षण
होंडा पंचायतीला पोलिस संरक्षण देण्यात आलेले आहे, कारण सदर घटना पंचायतीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालेली आहे. यामुळे सदर फुटेज व तेथील यंत्रणा नष्ट करण्याचा प्रयत्न नाकारता यण्यासारखा नाही. यामुळे इमारतीला पोलिस संरक्षण देण्यात आलेले आहे.
होंडा पोलिस चौकीची सीसीटीव्ही बंद
होंडा येथील पोलिस चौकीची सीसीटीव्ही यंत्रणा वर्षापूर्वीच बिघडलेली आहे. गाडीला आग लावण्याचा प्रयत्न झाला त्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना आवश्यक होते. मात्र पोलिस चौकीतील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असल्याने पोलिसांना पंचायतीच्या सीसीटीव्हीचा आधार घ्यावा लागला आहे. अन्यथा यासंदर्भातील पुरावाच नष्ट झाला असता. जवळपास एका वर्षापूर्वी सीसीटीव्ही यंत्रणा बिघडली असताना ती दुऊस्ती करणे किंवा त्याच्या जागी नवीन यंत्रणा बसविण्याचे गांभीर्य पोलिस अधिकाऱ्यांनी दाखविले नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.









