कोल्हापूर :
शहरातील एका हॉटेल व्यावसायिकाला धमकावित 10 हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलीस रेकॉर्डवरील गुंड अभय गोपीनाथ मोरे ऊर्फ आडग्या (वय 38, रा. शिवाजी पार्क, सध्या रा. कनाननगर, कोल्हापूर), शाम काकासा जाधव (वय 45, रा. विचारे माळ, कोल्हापूर), नागेश बाळू वाघमारे (वय 45, रा. कावळा नाका, कोल्हापूर) या तिघांना शाहुपूरी पोलिसांनी अटक केली. शनिवारी न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली. याबाबत हॉटेल व्यावसायिक प्रकाश शेखर शेट्टी (वय 53, रा. रुईकर कॉलनी, कोल्हापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
प्रकाश शेट्टी यांचे शहरातील मध्यवर्ती बसस्थानक परिसरात गिरीश नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये शुक्रवार (21 मार्च) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास रेकॉर्डवरील गुंड अभय मोरे ऊर्फ आडग्या, त्याचे साथिदार शाम जाधव, नागेश वाघमारे हे तिघे चहा–नाष्टा करण्यासाठी आले. हे तिघे चहा नाष्टा केल्यानंतर चहा–नाष्ट्याचे बिल न देता हॉटेलमधून बाहेर जावू लागले. यावेळी हॉटेलचे मालक शेट्टी यांनी त्याच्याकडे चहा नाष्ट्याच्या पैशाची मागणी केली. तेव्हा तिघांनी शेट्ठीना आमच्याकडे हॉटेलचे बिल मागायचे नाही. अन्यथा तुला ठार मारीन, अशी धमकी देतत तुला हॉटेल चालू ठेवायचे असेल, तर आम्हाला दरमहा 10 हजार रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी मागणी कऊन हॉटेलमधून निघून गेले. त्यानंतर शेट्टी यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांची भेट घेतली. त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगून, या तिघाविरोधी फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुंड अभय मोरे ऊर्फ आडग्या, त्याचे साथिदार शाम जाधव, नागेश वाघमारे या तिघाविरोधी धमकावणे, खंडणीची मागणी करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला. या तिघांचा तत्काळ शोध घेवून शुक्रवारी रात्री उशिरा अटक केली आहे
- त्याच्याविरोधी पोलिसात गुन्हे
अभय मोरे ऊर्फ आडग्या हा पोलीस रेकॉर्डवरील गुंड आहे. त्याच्या विरोधी शहरातील शाहुपूरी पोलीस ठाण्यात आणि आष्टा पोलीस ठाण्यात गंभीर स्वऊपाचे गुन्हे नोंद आहेत. यातील काही गुन्हे न्यायप्रविष्ठ आहेत. त्याने साथिदाराच्या मदतीने मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील व्यावसायिकाच्यावर चांगलीच दहशत निर्माण केली होती. त्याच्या दशहतीमुळे कोणीही त्याच्याविरोदी पोलिसात फिर्याद देण्यासाठी पुढे येत नव्हते.








