बेंगळूरच्या विधानसौध पोलिसांची कारवाई
बेंगळूर : राज्यसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचे उमेदवार सय्यद नासीर हुसेन यांच्या काही समर्थकांनी विधानसौधमध्ये ‘पाकिस्तान झिंदाबाद’ची घोषणा दिली होती. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. सदर घटनेची सत्यासत्यता तपासण्यासाठी सरकारने व्हिडिओ फॉरेन्सिक लॅबकडे पाठवून दिला होता. दरम्यान, घोषणाबाजीप्रकरणी तिघांना सोमवारी अटक करण्यात आली आहे. विधानसौध येथे कर्तव्यावर हजर असललेले पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे विधानसौध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. सोमवारी सायंकाळी मूळचा दिल्ली येथील इल्तियाज, बेंगळूरच्या आर. टी. नगर येथील मुनव्वर आणि हावेरी जिल्ह्याच्या बॅडगी येथील मोहम्मद शफी नाशिपुडी या तिघांना अटक केली. बेंगळूर केंद्रीय विभागाच्या पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल, प्रासंगिक पुरावे, संशयित आरोपींची जबानी यांच्या आधारावर ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना कोरमंगल येथे न्यायाधीशांसमोर हजर करून अधिक चौकशीसाठी पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतले आहे.









